गावातील मजुरांना गावातच मिळणार रोजगार

रत्नागिरी: महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कुशल निधीतून ग्रामपंचायत स्तरावर शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये भौतिक विकासाची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे गावातील मजुरांना काम मिळणार असून विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

शासनाच्या मनरेगा योजनेअंतर्गत कुशल व अकुशल कामांचे प्रमाण कायम ठेवून ग्रामपंचायत स्तरावर विविध भौतिक सुविधांची कामे केली जातात. यामध्ये गावातील सिमेट काँक्रीटचे रस्ते, सिमेंट नाली, पांदण रस्त्याचे मुरूम काम, सिंचन विहिरी, शौचालय, गटारे तसेच इतर कामांचा समावेश आहे. ही कामे करीत असताना गावचा विकास साधताना मजुरांच्या हाताला काम मिळवून देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
राज्यातील  चिखलदरा तालुक्यातील जैतादेही येथे मनरेगाअंतर्गत जिल्हा परिषदेची शाळा व अंगणवाडी केंद्रांमध्ये विविध भौतिक सुविधांची कामे करण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक गावात जिल्हा परिषदेची शाळाआणि अंगणवाडी केंद्रांत भौतिक निर्माण करण्यासाठी मनरेगाचा आधार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे आता मनरेगातून शाळांसह अंगणवाड्यांमधील भौतिक सुविधांची कामे होणार आहेत. त्यातून शाळा आणि अंगणवाड्यांचे रूप पालटताना मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे.

मनरेगांतर्गंत शाळा‚अंगणवाडीमध्ये किचन शेड बांधकाम, रेन वॉटर हार्वेस्टिंग संरचना, शोषखड्डा, शौचालय, क्रीडांगण आणि आवार भिंत विकास, वृक्षलागवड, आवश्यकतेनुसार पेव्हर ब्लॉक, शाळा‚अंगणवाडी परिसरातील गटारे व रस्ते बांधकाम, गांडूळ खत प्रकल्प, नाडेफ कंपोस्ट खत प्रकल्प ही कामे घेता येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेला निधी ग्रामपंचायतीच्या कृती आराखड्यानुसार शासनाकडून मनरेगाच्या कुशल कामांतर्गत उपलब्ध करून दिला जाणार आहे.