रत्नागिरीः– अनलॉकनंतर प्रत्येक गावात एसटी बसेस सोडण्याची मागणी होत आहे. परंतु विद्यार्थ्यांसह प्रवासी भारमान या संदर्भात ग्रामपंचायतींकडे अनेक वेळा पत्र व्यवहार करुनहि त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. एसटी तोट्यात आहे. सध्याच्या फेऱ्यांमधून डिझेलचे पैसेहि मिळत नाही. अशा स्थितीत एसटी महामंडळाने करायचे काय असा थेट सवाल एसटी अधिकाऱ्यांनी लोकप्रितनिधींना विचारला आहे. पंचायत समितीच्या मासिक बैठकीत एसटी अधिकाऱ्याने आपली खंत व्यक्त केली.
पंचायत समिती सौ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला गटविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्यासहित पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. विभाग निहाय आढावा घेताना एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सद्यस्थिती सभागृहात मांडली. तालुक्यातील सर्व भागांमध्ये शंभर पासून पंधराशे पर्यंत पासेस उपलब्ध देण्यात आले होते. परंतु विद्यार्थ्यांकडून पासेसला प्रतिसाद मिळत नाही. तर अनेक भागात जाणाऱ्या गाड्या रिकामी परत येतात. त्यामुळे काही भागातील फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. भारमान कोणत्या वेळी कसे याचे नियोजन करण्यासाठी महामंडळामार्फत सरपंचाकडे पत्र व्यवहार करण्यात आला आहे. परंतु एकाहि सरपंचांनी एसटीच्या पत्राला उत्तर दिलेले नाही अशा स्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांकडून एसटी सुरु करण्याची मागणी करण्यात येते. परंतु गावपातळीवरील लोकप्रितनिधी अपेक्षित सहकार्य करीत नसल्याचा आरोप एसटीच्या अधिकार्यांनी सभागृहात केला. पंचायत समिती सेसमधून १५४ कामे मंजुर झाली होती. त्यातील ७३ कामे पूर्ण झाली असून उर्वरीत कामे सुरु करण्यात येणार आहेत. मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्याने त्याचा परिणाम विकास कामांवर झाला आहे. ग्रमपातळीवरील कामे तातडीने पूर्ण करा अशी सुचना ग्रामपंचायतीला करण्यात आल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे १४५१ चे उद्दीष्ट देण्यात आले होते. कोरोना कालावधीत शिबीरांचे आयोजन करणे शक्य नसल्याने यावर्षी प्रथमच १३८ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. उर्वरीत उद्दीष्ट लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकिय अधिकारी महेंद्र गावडे यांनी सांगितले. रत्नागिरी तालुक्यात आतापर्यंत २६४० कोरोना रुग्ण आढळले होते. त्यातिल २५१६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. ३५ रुग्ण सध्या उपचार घेत असून त्यांच्यावर सामाजिक न्याय भवन, महिला रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत.