गावागावातील लोकांच्या कोरोना चाचण्या करवून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा

जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या सूचना 

रत्नागिरी:- ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहीमेंतर्गत गावागावातील लोकांना कोरोना चाचण्या करवून घेण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य, पंचायत समिती सदस्यांनी पुढाकार घ्यावा. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सुचना जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिल्या आहेत.

गावागावात ग्रामकृतीदलामार्फत लोकांच्या प्राथमिक तपासण्या करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या पार्श्‍वभुुमीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी, सदस्य आणि जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त ऑनलाईन बैठक झाली. यामध्ये काही सदस्यांनी सुचनाही मांडल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. अनेकजण वेळेत चाचण्या करत नाहीत. कालांतराने ऑक्सिजन पातळी कमी होते आणि तो दगावतो. चाचण्या करुन घेण्याची ग्रामीण भागातील लोकांची मानसिकता नाही. ही मानसिकता बदलण्यासाठी सदस्यांनी प्रयत्न केले पाहीजेत. लोकांशी संवाद साधला पाहीजे अशा सुचना विक्रांत यांनी यावेळी केल्या.

माझी जबाबदारी मोहीमेत सर्वांनी सहभागी झाले पाहीजे. जिल्हा परिषदेने गावागावात तपासणी पथके बनवली आहेत. लपूनछपून राहणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. लवकरच सोळा रुग्णवाहिका मिळणार आहेत. तपासण्यांमध्ये बाधित आढळल्यास गावपातळीवर उपचारासाठी ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार कोविड केअर सेंटर उभारण्यास जिल्हा प्रशासन सहकार्य करेल असे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तिथे लागणारे वैद्यकीय अधिकारीही पुरवले जातील. सक्षम असलेल्या ग्रामपंचायतींनी यासाठी पुढकार घ्यावा असेही आवान यावेळी करण्यात आले. आजार अंगावर काढल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत विचारविनिमय झाला.