गावागावातील ग्रामदेवतांना लागली रूपे; शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला

रत्नागिरी:-  शिमगा…म्हणजे कोकणतला सर्वात मोठा सण असलेल्या या पारंपारिक होलिकोत्सवाचा आनंद गावागावात दिसू लागला आहे. फाकपंचमीला होळी उभारून विधिवत पूजन करून या शिमगोत्सवाला सुरूवात झालेली आहे. तर या शिमगोत्सवासाठी गावोगावच्या देवदेवतांना रूपं लावण्याची लगबग ग्रामस्थांची पाहायला मिळतेय.

परंपरा, उत्साह आणि मानपान यांचा संगम असलेल्या शिमगोत्सवाला मंगळवारी फाकपंचमीपासून सुरूवात झाली आहे. शिमगोत्सवात फागपंचमीला होळी उभारून विधिवत पूजन करून या शिमगोत्सवाला सुरूवात झालेली आहे. हा सण प्रत्येकांच्या अंगात एक वेगळेच चैतन्य व उत्साह संचारतो. या शिमगोत्सवाची रंगत अगदी पौर्णिमेपर्यंत धुलिवंदनापर्यंत सुरू राहते. पण त्यापूर्वी ग्रामदेवतांच्या पालख्या सजवण्यासाठी देवांना रुपे लावण्यासाठी ग्रामस्थांची लगबग सुरू होते. त्यानुसार ग्रामदेवतांच्या मंदिरातून पालख्या सजवून देवांना रूपे लावण्यास प्रारंभ झाला आहे.

मंगळवारी रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे येथील ग्रामदैवत श्री कालिका देवीच्या पालखीला सजवून देवांना रूपे लावण्याचा कार्यक्रम मोठय़ा भक्तीपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. त्यासाठी सर्व ग्रामस्थांना गावबैठकीचे निमंत्रण धाडण्यात आले होते. गावकरी, मानकरी, खोत, गुरव अशा साऱयांची गावबैठक त्या त्या गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरात घेण्यात आली. शिमगोत्सवात होळी तोडण्यापासून ते देवाला रूप लावण्यापर्यंत सर्व मान हे पिढ्यांपिढ्यानुसार ठरलेले आहेत. त्यानुसार यादिवशी कालिकादेवाच्या पालखीतील देवांना रूपे लावण्याचा कार्यक्रम पार पडला.

मिरजोळोचे गावप्रमुख (मानकरी) शरद पाटील, प्रमुख गावकर दत्ताराम गावकर, तसा अन्य मानकरी, गुरव, गावकरी यांया उपस्थितीत मंदिरात देवतांच्या चांदीच्या मूर्त्यांना विधिवत पूजन व त्यांना रुपे लावण्यात आली. मूर्तींना आंघोळ घालून विविध सोन्याचांदिच्या दागिन्यांनी सजवण्यात आले. पालख्यांमध्ये नववस्त्रांचा साज चढविला गेला. त्यात देवतांच्या आर्कषक दागिने परिधान केलेल्या मूर्त्यांचा बसविण्यात आल्यानंतर पालखी सजविण्यात आली. सर्व ग्रामस्थ गाव समृध्दी, ग्रामस्थांचा एकोपा नांदण्यासाठी गार्हाणे घालून पालखीला देवाच्या सहाणेवर विराजमान करण्यात आले.

अशाप्रकारे कोकणातील अशा या आनंदमयी शिमगोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. गावांमध्ये भक्तीमय वातावरणात हा शिमगोत्सव पार पाडण्यासाठी गावबैठकांचे नियोजन सुरू झालेले आहे. तेरसे (पौर्णिमे अगोदरचे) शिमगा व भद्रेच्या मुर्हूतावर, पौर्णिमेचा शिमगा उत्सव साजरे होणार आहेत. प्रत्येक गावांतील शिमगोत्सव साजरा करण्याच्या प्रथाही वेगवेगळय़ा दिसून येतात.