गावखडी, आंजर्ले गावांची निसर्ग पर्यटनाकरिता निवड

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कांदळवन संवर्धन योजनेंंतर्गत खेकडे पालन, पिंजर्‍यातील मत्स्यशेती, शोभिवंत मत्स्यशेती व निसर्ग पर्यटन अंतर्गत 19 गावांमध्ये प्रकल्प राबविण्यात येत असून, यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. निसर्ग पर्यटनाकरिता दापोली तालुक्यातील आंजर्ले, रत्नागिरी तालुक्यातील गावखडी या गावांची निवड करण्यात आली असून, येथील प्रकल्पांना निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सहा गावांमध्ये शोभिवंत मत्स्यपालन प्रकल्प राबविण्यात येणार असून, दापोली तालुक्यामध्ये आडे गावात चार युनिट तर रत्नागिरी तालुक्यातील वरवडे येथे एक व राजापूर तालुक्यातील सागवे येथे एका युनिटला मान्यता देण्यात आली आहे.
कालवी पालन प्रकल्पही राजापूर तालुक्यातील अणुसरे, जानशी, धाऊलवल्ली, जुवे जैतापूर, बुरंबेवाडी येथे सुरू करण्यात आला आहे. गावखडी येथे पिंजर्‍यातील मत्स्यपालन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. खेकडा पालन प्रकल्प मालगुंड, राई, पावस, वरवडे, गडनरळ, जानशी, सागवे व दापोली तालुक्यातील मुर्डी या गावात राबविण्यात येणार आहे.  

आंजर्ले येथे कयाग बोटिंग, मरीन वॉक, कांदळवन सफारी, पक्षी निरीक्षक, तारे निरीक्षण या सुविधा प्रस्तावित असून रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे कासव संवर्धन विषय जनजागृती व माहिती फलक बसविण्यात येणार आहेत. स्वयंरोजगाराविषयी प्रशिक्षण देणे, क्षमता बांधणी करणे, रोजगाराची संधी उपलब्ध करणे असा या उपक्रमाचा उद्देश आहे.