रत्नागिरी:- जुलैअखेर कोरडा काढल्यानंतर गुरुवारपासून पुढील पाच दिवस कोकणात काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येणार्या पाच दिवसांमध्ये कोकणातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातही पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गेले अनेक दिवस पावसाने उसंत घेतली आहे. चार ऑगस्टपासून कोकणामध्ये बर्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यासोबतच कोकण किनारपट्टी भागात देखील काही ठिकाणी पाऊस पडेल. तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोकणात बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाबरोबरच दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात 4.33 मि.मी.च्या सरासरीने 40 मिमी. पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड तालुक्यात 10 तर दापोली तालुक्यात 7 मि. मी. पावसाची नोंद झाली. अन्य तालुक्यात किरकोळ पाऊस झाला. दरम्यान पाऊस ओसरल्याने जिल्ह्यातील खरीप क्षेत्रात भात पीकाबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
अनेक भागात पावसाने विश्रांती घेतल्याने भात पिके सुकू लागली आहेत. वाढत्या तापमानाने पिकावर करपा अथवा तत्सम रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आता शेेतकर्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.