गवत कापायला गेलेल्या तरुणाचा विंचूदंशाने मृत्यू

चिपळूण:- चिपळूणजवळील कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका ३५ वर्षीय तरुणाचा विंचूदंशामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गवत कापण्यासाठी शेतात गेलेल्या या तरुणाला विंचू चावला आणि उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अजय वसंत मोरे (वय ३५ वर्षे, रा. पोसरे, साडेवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी अजय मोरे हे गवत कापण्यासाठी शेतात गेले होते. त्याचवेळी त्यांना विषारी विंचवाने दंश केला. विंचूदंशाची घटना घडल्यानंतर त्यांना त्वरित कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अजय मोरे यांना दुपारी ३.२६ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. मात्र, विष शरीरात जास्त प्रमाणात भिनल्याने उपचारांना यश आले नाही. अखेरीस, त्याच दिवशी सकाळी सुमारे १०.०० वाजता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अजय मोरे यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे करण्यात आली असून, पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ६४/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे ‘वारस’ म्हणून नोंद करण्यात आली आहे. गवत कापायला गेलेल्या तरुणाचा विंचूदंशाने मृत्यू झाल्याने खेड आणि चिपळूण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.