गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाड्या

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर गणपती स्पेशल गाड्यांच्या आणखी काही फेर्‍या जाहीर करण्यात आल्या आहेत. गुजरातमधील उधना ते मडगाव, अहमदाबाद कुडाळ तसेच उधना ते मंगळूर दरम्यान या गाड्या धावणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी या आधी अनेक फेर्‍या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून कोकण रेल्वे मार्गावर आणखी काही गाड्यांची भर पडली आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने काढलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार, उधना ते मडगाव ही द्वि साप्ताहिक गाडी दि. 16, 20 ,23, 27, 30 सप्टेंबर रोजी उधना येथून दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी सुटून दुसर्‍या दिवशी ती मडगावला सकाळी साडेनऊ वाजता पोहोचेल. या गाडीला जिल्ह्यातील खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.
अहमदाबाद ते कुडाळ मार्गावरील गणपती विशेष गाडी आठवड्यातून एकदाच आहे. ही गाडी दि. 12, 19, 26 सप्टेंबर रोजी अहमदाबाद येथून तर दि.13, 20, 27 सप्टेंबर रोजी कुडाळ येथून सुटणार आहे. या गाडीला खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड या ठिकाणी थांबा
आहे.

उधना ते मंगळूर दरम्यान आठवड्यातून एकदा धावणार आहे. ही गाडी (09057/09058 ) ही उधना येथून 13,27,29 सप्टेंबर रोजी तर मंगळूर येथून उधनासाठी दि. 14, 21 व 28 सप्टेंबर रोजी सुटणार आहे. या गाडीला रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड असे थांबे आहेत.