गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करा: आ. जाधव

चिपळूण:- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रवाशांसाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या सोडण्यात याव्यात आणि त्या पुढे कायम करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी शुक्रवारी मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केली.

ते म्हणाले, तीस वर्षांपूर्वी कोकणातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या म्हणून कोकण रेल्वेचे स्वप्न साकार झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मोठे बंदर एकमेकांशी जोडले गेले; मात्र ज्यांच्या जमिनीवर हा प्रकल्प उभा राहिला ते कोकणातील चाकरमानी आजही उपेक्षित आहेत. कोकण रेल्वे कोकणातील चाकरमान्यांसाठी फायद्याची ठरेल, असे वाटत असताना कोकणी चाकरमानी आजही उपेक्षित आहे. सण, उत्सव किंवा खासगी कामासाठी मुंबईतून गावी येताना त्यांना रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळत नाही.

दोन ते तीन महिने आधी रेल्वेचे तिकीट बुकिंग करून सुद्धा त्यांना मिळत नाही. गणेशोत्सवासाठीचे आगाऊ तिकीट दोन मिनिटात आरक्षित होते. त्यामुळे दोन डब्यांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत किंवा शौचालयाच्या जागेत उभे राहून कोकणातील प्रवाशांना प्रवास करावा लागतो. कोकणातील जनतेच्या फायद्याची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली नंतर दिवा-रत्नागिरी अशी पॅसेंजर सुरू करण्यात आली. तिही वेळेची अनियमितता आणि क्रॉसिंगसाठी लागणाऱ्या वेळेचे कारण दाखवून बंद करण्यात आली. असे असताना उत्तरप्रदेशसाठी दोन नव्या गाड्या याच मार्गावर सुरू करण्यात आल्या. त्यामुळे कोकण रेल्वे हा मार्ग नक्की कुणासाठी, असा प्रश्न पडतो. सध्या गणेशोत्सव तोंडावर आहे. रेल्वे महामंडळाने कोकणातील चाकरमान्यांसाठी विशेष गाड्या सुरू कराव्यात आणि त्यापुढे कायम ठेवाव्यात, अशी मागणी आमदार जाधव यांनी या वेळी केली.