गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक नाही: ना. सामंत

रत्नागिरी:- रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक नसल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. मात्र चाकरमान्यांनी स्वत:हून काळजी घेऊन ग्रामस्थांसह कुटुंबीय सुरक्षित ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले.

कोकणात येणार्‍या चाकरमान्यांना दोन डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामकृती दलांना याबाबत तपासणीच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गावांमध्ये गोंधळ दिसून येत होता. अगदी रेल्वेस्थानकावरही काही ठिकाणी आरटीपीसीआर किंवा अ‍ॅन्टीजेन टेस्ट केल्या जात होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, सिंधुदुर्गचे पालकमंत्री व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये  येणार्‍या चाकरमान्यांसाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक नसल्याचे स्पष्ट केले.

मुळात अठरा वर्षापर्यतच्या मुलांना अद्याप कोरोनाचे लसीकरण सुरु झालेले नाही. अनेकांचे दोन डोस तर काहींचे एक डोस घेऊन झाले आहेत. आरटीपीसीआर टेस्टमुळे झालेला गोंधळ दूर करण्यासाठी त्यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील व सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी  श्रीमती मंजूलक्ष्मी यांच्याशी चर्चा केली. ग्रामकृतीदलांनी दोन डोस व आरटीपीसीआर झाली नसेल त्यांना टेस्टसाठी सक्‍तीचे करु नये. ज्या चाकरमान्यांना लक्षणे जाणवत असतील त्यांनी स्वत:हून काळजी घ्यावी. ग्रामकृती दलाला याची माहिती द्यावी. स्वत:च्या कुटुंबियांची व ग्रामस्थांची काळजी घेण्याची जबाबदारी चाकरमान्यांची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत रत्नागिरी जि.प.चे उपाध्यक्ष उदय बने, नगराध्यक्ष प्रदीप साळवी उपस्थित होते.