गणेशोत्सवासाठी एक लाख चाकरमानी जिल्ह्यात दाखल 

रत्नागिरी:- पावसाने विश्रांती घेतल्यामुळे थाटामाटात, पारंपरिक वाद्यांच्या गजरात जिल्ह्यात सुमारे 114 सार्वजनिक तर 1 लाख 66 हजार 539 खासगी श्री गणरायाची प्रतिष्ठापना मंगलमय वातावरणात झाली. दुपारनंतर घराघरांगमध्ये सुखकर्ता दुखहर्ता….चे सूर घुमू लागले होते. कोरोनामुळे निर्माण झालेले निरुत्साही वातावरण गणपतीच्या आगमनाने प्रफुल्लीत झाले होते. प्रत्येकजणं विघ्नहर्त्याकडे ‘कोरोनाचे सावट दूर कर…’अशी प्रार्थना करत होते. गणेशोत्सवासाठी आजपर्यंत एसटी, रेल्वेसह खासगी गाड्यांनी लाखभर चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले होते.

पावसाचे सावट टाळण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे अनेकांनी एक दिवस आधीच गणेशमुर्ती घरापर्यंत आणून ठेवल्या होत्या. तर चित्रशाळा जवळच असलेल्या गणेशभक्तांनी शुक्रवारी (ता. 10) सकाळपासून श्री गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु केली होती. रत्नागिरीसह चिपळूण शहरात चित्रशाळा, दुकानांमध्ये मुर्ती आणण्यासाठी भक्त सरसावले होते. गणपती बाप्पा मोरया…..म्हणत भक्तगण आनंदात घरी जात होते. शहरात चारचाकी गाड्यांमधून गणपतीच्या मुर्ती नेण्यात येत होत्या. मात्र मोठ्या मिरवणुका काढल्या जात नव्हत्या. घरातील चार-पाच लोकांच्या उपस्थितीतमध्ये कार्यक्रम सुरु होते. रत्नागिरीतील कर्ला-आंबेशेत-जुवेची परंपरा सलग दुसर्‍या वर्षी खंडीत झाली. ग्रामीण भागात पारपंरिक पध्दतीने ढोल-ताशांच्या गजरात डोक्यावर मुर्ती घेऊन भक्तगण गणरायाचे स्वागत करताना दिसले. घरी आलेल्या गणरायाचे स्वागत, मनोभावे पुजन, आरत्या आणि त्यानंतर प्रसादाचा आस्वाद अशा पध्दतीने गणेश चतुर्थी साजरी केली गेली. प्रत्येकजणं कोरोनापासून सर्वांची सुरक्षा कर आणि हे संकट दूर कर असे साकडं घालताना पहायला मिळत होते. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे भक्तगणांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. कोरोनामुळे पारंपरिक पध्दतीने काढल्या जाणार्‍या मिरवणुका काढता आल्या नाहीत.

एसटीच्या 1200 गाड्या रत्नागिरीत

गणरायाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळाने मुंबईतील विविध स्थानकामधून गाड्यांची व्यवस्था केली होती. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात 1200 गाड्या दाखल झाल्या. त्यामधून सुमारे पन्नास हजाराहून अधिक चाकरमानी आले आहेत. कोकण रेल्वेच्या माध्यमातूनही हजारो प्रवासी आले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरुन खासगी वाहनांमधून आलेल्या चाकरमान्यांना खड्ड्यांचा सामना करावा लागला. चौपदरीकरणाच्या कामांसह पावसामुळे पडलेल्या खड्डे आणि वाहतुक कोंडीमुळे दहा ते बारा तासांचा रत्नागिरीत येण्याचा प्रवास सोळा तासांवर गेल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या.