रत्नागिरी:- गणेशोत्सवानंतर आता नवरात्रौत्सवाची धूम आज सोमवारपासून गूंजणार आहे. जिल्ह्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुमारे ३९४ सार्वजनिक ७० वैयक्तिक देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे रास-गरबा नृत्यावर बंधने होती; मात्र यंदा तरुणाई नेहमीच्या पध्दतीने थिरकण्यास सज्ज झाली आहे.
सर्वपित्री आमावास्येच्या मुहूर्तावर रविवारी सकाळच्या सत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे घटस्थापनेवर पावसाचे सावट आहेच. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे भक्तांनी निःश्वास सोडला. सायंकाळी विविध मंडळांनी देवींच्या मुर्ती प्रतिष्ठापना करायच्या ठिकाणी वाजतगाजत नेण्यास सुरवात केली होती. पावसाच्या शक्यतेमुळे मोठ्या मिरवणुका निघाल्या नाहीत. उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर देवीची शास्त्रपध्दतीने पुजा करुन प्रतिष्ठापना केली जाईल. ठिकठिकाणी मंडप सजलेले आहेत, रोषणाई केली आहे. यंदा तरुणाईचा उत्साह अधिक दिसत आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे तरुणांनी रास-गरबा खेळता आला नव्हता. ना स्पर्धा रंगल्या ना मनसोक्तपणे दांडिया खेळण्याचा आनंद घेता आला. ती कसर भरुन काढण्यासाठी तरुण-तरुणी सज्ज झाल्या आहेत. काही मंडळातर्फे स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. या बाजारात विविध प्रकारचे कपडे, दांडिया विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. घरोघरीदेखील घट बसविण्यात येणार असून त्यासाठी सर्वजण तयारी करताना दिसत आहेत. त्यात ओले आणि सुके घट बसवण्याची प्रथा आहे. त्याशिवाय केवळ फोटोची प्रतिष्ठापना करुन नवरात्रोत्सव साजरा केला जातो. जिल्ह्यातील रत्नागिरी शहरातील भगवती देवी, आडिवरे येथील महाकाली, चिपळूणची विंध्यवासिनी देवीच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. विशेषतः महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी येथे गर्दी असते. त्यामुळे देवीच्या मंदिरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
झेंडूचा दर आवाक्यात
महालक्ष्मी पुजनासाठी लागणारी झेंडूची फुले विकणारे विक्रेते रत्नागिरीत दाखल झाले आहे. शहरातील जयस्तंभर परिसरात हे विक्रेते दुकाने थाटून आहेत. यंदा कोल्हापूरमध्ये मोठ्याप्रमाणात पूर येईल एवढा पाऊस झालेला नाही. त्यामुळे झेंडूचे उत्पादन चांगले आले आहे. परिणामी झेंडूचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. किलोला १६० रुपये दर आहे. गतवर्षी हाच दर दोनशे ते तिनशे रुपये होता.