रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी खास रोहा ते चिपळूण दरम्यान 32 डेमू रेल्वे सेवा चालविण्यात येणार आहेत. गणेशोत्सवातील कोकण रेल्वे मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यावर्षी प्रथमच हा निर्णय घेतला आहे. रोहा ते चिपळूण आणि चिपळूण ते रोहा अशी 32 डेमू रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
दरवर्षी गणेशोत्सवात कोकण रेल्वेला गर्दी असते. चाकरमानी कोकण रेल्वेमधून रत्नागिरी, सिंधुुदुर्ग, गोवा या ठिकाणी जात असतात. या कालावधीत रेल्वेदेखील कमी पडतात. हे लक्षात घेऊन याआधी गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा झाली आहे. त्यामुळे आता 32 ज्यादा गाड्यांमुळे यावर्षी गणपती स्पेशल गाड्यांची संख्या 198 होणार आहे.
01157 ही डेमू रेल्वेगाडी दररोज रोहा ते चिपळूण धावणार आहे. रोहा येथून दररोज सकाळी 11:05 वा. ही गाडी निघेल व त्याच दिवशी दुपारी 1:20 वा. चिपळूणला पोहोचेल तर 01158 ही मेमू रेल्वेगाडी चिपळूण येथून 19 ऑगस्टपासून ते 12 सप्टेंबरपर्यंत दररोज दुपारी 1:45 वा. चिपळूणहून सुटेल आणि रोहा येथे सायंकाळी 4:10वा. पोहोचेल. ही गाडी माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे आणि खेड या ठिकाणी थांबेल. आठ डब्यांची ही गाडी असून प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्यावतीने करण्यात आले आहे.