गणेशोत्सवातील गाड्यांचे १० मे पासून आरक्षण खुले

रत्नागिरी:- यावर्षी ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर गणेशोत्सवात धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण १० मेपासून खुले होणार आहे. या गाड्यांची आरक्षित तिकीटे मिळवण्यासाठी तिकीट खिडक्यांवर चाकरमान्यांची झुंबड उडणार आहे. कोकण मार्गावर नेमक्या किती गणपती स्पेशलच्या फेऱ्या धावणार, हे अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. यामुळे गणेशभक्तांच्या नजरा ‘गणपती स्पेशल’ गाड्यांकडेच खिळल्या आहेत.

गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होतात. या काळात रेल्वेगाड्यांचे आरक्षण १२० दिवस आधी खुले होते. यामुळे आरक्षित तिकीटे पदरात पाडण्यासाठी चाकरमान्यांना तासन्तास तिकीट खिडक्यांवर उभे रहावे लागते. मात्र दोन ते तीन मिनिटातच आरक्षण हाऊसफुल्ल होत असल्याने गणेशभक्तांच्या पदरी निराशाच पडते.

या पार्श्वभूमीवर १० मे पासून आरक्षण खुले होणार असल्याने चाकरमानी सुखावले आहेत. १० मे रोजी ७ सप्टेंबरच्या प्रवासाचे आरक्षण, ११ रोजी ८ सप्टेंबर, १२ रोजी ९ सप्टेंबर, १३ रोजी १० सप्टेंबर, १४ रोजी ११ सप्टेंबर, १५ रोजी १२ सप्टेंबर, १६ रोजी १३ सप्टेंबर, १७ रोजी १४ सप्टेंबर, १८ रोजी १५ सप्टेंबर, १९ रोजी १६ सप्टेंबर, २० रोजी १७ सप्टेंबर, २१ रोजी १८ सप्टेंबर, २२ रोजी १९ सप्टेंबर, २३ रोजी २० सप्टेंबर तर २४ रोजी २१ सप्टेंबर तर २५ रोजी २२ सप्टेंबरच्या प्रवासाचे आरक्षण करता येणार आहे.

रेल्वे प्रशासनाने आरक्षण व प्रवासाच्या तारखा जाहीर केल्या असल्या तरी गणेशोत्सव कालावधीत कोकण मार्गावर किती गणपती स्पेशल गाड्यांचे फेऱ्या चालवण्यात येणार आहेत, हे अद्याप जाहीर केले नसल्याने गणेशभक्त संभ्रमावस्थेतच आहेत.