रत्नागिरी:- कोकणातला महत्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सव आता अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. मात्र यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. गणेश चित्र शाळांमध्ये सुद्धा याचा परिणाम दिसत आहे. त्यामुळेच सध्या चित्र शाळांमध्ये सुद्धा विशेष खबरदारी घेतली जात आहे. याच खबरदारीच्या पार्श्वभूमीवर चित्र शाळांमध्ये लावण्यात आलेल्या सूचना पाट्या लक्षवेधी ठरत आहेत.
कोकणात गौरी-गणपतीचा सण अगदी घराघरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक कोकणी कुटुंबात या सणाबद्दल एकप्रकारचा व्यक्तिगत मनोभाव तयार झालेला आहे. त्यामुळे घरगुती गणेशोत्सवाचं स्वरूपही सार्वजनिक गणेशोत्सवासारखं असतं. या सणाला देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असलेला कोकणी आपल्या गावी अगदी हमखास येतोच. यावर्षी मात्र या सणावार कोरोनाचं सावट आहे.
सध्या गणेश गुणेशमुर्तीशाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग दिसत आहे. विविध आकारातील सुबक गणेशमुर्ती घडवण्याची कामं सध्या सुरु आहेत. अनेक गणेशमुर्तीशाळांमध्ये मूर्तिकाम अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यात अनेक मूर्तिशाळांमध्ये प्रामुख्याने शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवल्या जातात. या शाडू मातीच्या मूर्ती पर्यावरणपूरक असल्याने अनेकांची पसंती शाडू मातीच्या मूर्तींना असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती शाळांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. मूर्ती शाळेमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी सक्त सूचना दिल्या जातात शिवाय सुचनांच्या पाट्याही लावण्यात आल्या आहेत. याच पाट्या सध्या लक्षवेधी ठरत आहेत.
गणेशमुर्तीशाळेंच्या बाहेर सध्या मास्क शिवाय आतप्रवेश नाही, योग्य अंतर राखा, गणपतीचा पाट दिल्यानंतर गणपती किती तायर झालाय हे पहायला वारंवार येवू नका, एकावेळी एकाच व्यक्तीने आतमध्ये यावे तेही परवानगीने, गणपतीचा साचा मागायला येवू नये अशा विविध प्रकारच्या सुचना लिहिण्यात आल्या आहेत. शिवाय कोरोनामुळे यावर्षी मूर्तीशाळेत मूर्ती सजावटीसाठी येऊ नये, 10 जुलै नंतर येणाऱ्यांनी तयार असलेल्या मूर्तीचीच निवड करावी आशा सक्त सुचनांच्या पाट्या गणेशमूर्ती शाळांमध्ये लावण्यात आल्या आहेत. भाविकही या सुचनांचं पालन करत असल्याचं मूर्तिकार सांगतात.
तर दुसरीकडे मूर्ती घडवताना देखील मुर्तीकार सोशल डिस्टसिंग ठेवून काम करताना पहायला मिळत आहेत. एकूणच काय तर गणेशमुर्ती चित्र शाळेत कोरोनाच्या संकटाच्या पाश्वभूमीवर आवश्यक असलेली खबरदारी घेवून गणेशमुर्ती रेखाटल्या जात आहेत. मात्र सुचनांच्या पाट्या लक्षवेधी ठरत आहे..