गणेशगुळे समुद्रकिनारी बेवारस बोट सापडल्याने खळबळ 

रत्नागिरी:- तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनार्‍यावर बेवारस मच्छीमार बोट सापडल्याने एकच खळबळ उडाली. बोटीत अद्ययावत यंत्रणा असल्याने बोट नेमकी कधी बुडाली असावी याचा अंदाज बांधणे कठीण असून याची माहिती मत्स्य विभागाला देण्यात आली होती. 
 

गेले काही दिवस वादळी वारा, जोरदार पाऊस आणि समुद्राला आलेल्या उधाणामुळे बोट उलटली असण्याची शक्यता आहे. गणेशगुळे समुद्रकिनार्‍यावर बेवारसपणे मच्छीमार बोट पाण्यात तरंगत असल्याचे दिसले. ही बोट ग्रामस्थांना दिसल्यानंतर याबाबत पोलीस पाटील संतोष लाड यांनी पाहणी केली. पाण्यातील बोटीला रस्सी बांधून किनार्‍यावर आणली. त्यानंतर श्री. लाड यांनी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांना तातडीने कळवले. त्यानंतर श्री. गावीत यांनी गणेशगुळे समुद्रकिनार्‍यावर धाव घेतली.

ही बोट मच्छीमारी करणारी असून वादळामध्ये भरकटत आली असावी. या बोटीवर अरेबियन भाषेत नाव लिहिलेले आहे. त्यामुळे त्या संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. या बोटीला दोन अत्याधुनिक मशीन्स असून अन्य काही आढळून आले नाही. त्यामुळे यासंदर्भात पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने रत्नागिरी मत्स्य विभागाला माहिती देण्यात आली आहे.

पावसपासून फक्त 4 किलोमीटरवर असलेला गणेशगुळे गावातील समुद्रकिनारा सुरक्षित व स्वच्छ आहे. कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे या किनार्‍यावर सध्या कोणाचाच वावर नसतो. परंतु सागरी किनारा रक्षक तसेच जागरुक नागरिक किनार्‍यावर पाहणी करून येतात. त्यामुळे बोट तरंगत असल्याचे लक्षात आले. दहशतवाद्यांचा हल्ला समुद्रकिनारी मार्गाने होऊ शकतो. यामुळे तटरक्षक दल, एनसीसी तसेच सागरी पोलिसांतर्फे किनारी भागांत नेहमीच ग्रामस्थांना जागरूक राहण्यासंबंधी सूचना दिल्या जातात. तसेच सागरी पोलिस ठाण्यांची गस्तसुद्धा गणेशगुळे गावात नेहमी होत असते. त्यामुळे गणेशगुळ्यातील जागरुक ग्रामस्थांमुळेच बोट आढळल्याची खबर त्वरित पोलिसांना देण्यात आली.