रत्नागिरी:- गणपतीपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक लावून त्यात आंबा, काजू बागायतदारांच्या समस्यांवर तोडगा काढला जाईल. तसेच बागायतदारांना शासनाकडून पॅकेज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत दिले.
बागायतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अल्पबचत सभागृहात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, ज्येष्ठ बागायतदार काका मुळ्ये, डॉ. विवेक भिडे, प्रदीप सावंत, प्रसन्न पेठे, तुकाराम घवाळी, नंदू मोहिते, बावा साळवी यांच्यासह अनेक बागायतदार आणि निबंधक, कृषी, पणनचे अधिकारी उपस्थित होते. आंब्याला हमीभाव मिळाला पाहीजे, वानरांचे निर्मूलन, निवळी-जयगड रस्त्याची दुरवस्था असे प्रश्न काका मुळे यांनी मांडले. यावर मंत्री सामंत म्हणाले, बागायतदारांचे काही प्रश्न सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागणार आहेत. ते मुख्यमंत्र्यांपुढे मांडून त्यावर तोडगा काढला जाईल. त्यासाठी बागायतदारांचे शिष्टमंडळाबरोबर बैठक झाली पाहीजे. शक्य झाल्यास ही बैठक सोमवारी किंवा मंगळवारी आयोजीत करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांबरोबर प्राथमिक बोलणंही झालेले आहे. बागायतदार नाराज होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या बैठकीत बागायतदारांनी व्याजमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावरही मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. लवकरच बँका आणि बागायतदार यांची एकत्रित बैठक घेऊन त्यात यावर चर्चा करु. यामध्ये कोणत्या बँका सकारात्मक आहेत, याची पडताळणी केली जाईल. त्यावेळी पन्नास टक्के आंबा पिक बाधित असल्याचे शासनाला पाठवलेले पत्र कृषी विभागाकडून सादर केले जावे अशी सुचना मंत्री सामंत यांनी केली. आंबा बागायतदारांना हमीभाव मिळावा यासाठी पुर्वी चर्चा झाली होती. मात्र हमीभाव या शब्दाला अनेकांचा आक्षेप होता. त्यामधून मार्ग काढण्यासाठी जिल्हास्तरावर नियोजन करुया. कॅनिंगच्या आंब्याचा दर कृषी, पणन, कोकण कृषी विद्यापिठ यांनी एकत्रित येऊन निश्चित करावा. तोच सर्वांसाठी लागू करावा. त्यासाठी कमिटी स्थापन करावी. गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूसंदर्भातील प्रयोग यशस्वी केला होता. तोच यंदा रत्नागिरीत आंब्यासाठी करु असे त्यांनी प्रशासनाला सांगितले. तसेच स्थानिकांचा आंबा कमी पडला तरच बाहेरून आंबा आणला जाईल. याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नाही, तर योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.