गणपतीपुळे समुद्रात 4 जण बुडाले

चौघांनाही वाचवण्यात मोरया वॉटर स्पोर्टच्या बोटचालकांना यश 

गणपतीपुळे:- रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात चार जण बुडाले. समुद्रकिनाऱ्यावरील मोरया वॉटर स्पोर्टच्या बोटचालकांनी बुडणाऱ्या चौघांनाही वाचवले.  ही घटना रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. 

गणेश सुतार (35), शमाली सूर्यवंशी (38), मृदुला सूर्यवंशी (18) व मंदी सूर्यवंशी (14) अशी बुडणाऱ्या चौघांची नावे आहेत.  हे सर्वजण सातारा नांदवडे तालुका कोरेगाव येथील रहिवासी आहेत. या चौघांनाही वाचवण्यात यश आले आहे. हे चौघेजण पोहण्यासाठी अति उत्साहात समुद्राच्या खोल पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खाऊ लागले. बुडताना हात उंचावून वाचवण्यासाठी मदत मागत होते. याचवेळी समुद्राकिनाऱ्यावर असलेल्या बोट चालकांच्या लक्षात आले. यावेळी क्षणाचाही विलंब न लावता बोट चालकांनी आपली बोट खोल समुद्रात नेऊन आपली धाडसी कामगिरी करत त्या चार जणांना मरणाच्या दाढेतून बाहेर काढले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

यावेळी गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर असलेले गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अक्षय माने व गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षारक्षक पवार यांनी ही पर्यटकांना वाचविण्यासाठी जेसकी बोट चालकांना मोलाची मदत केली यांतील गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अक्षय माने व गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षारक्षक श्री. पवार यांनी खोल समुद्राच्या पाण्यात गेलेल्या त्या चार जणांना खोलवर पाण्यात जाऊ नका असा इशारा दिला होता मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आपला अतिरेक व बेजबाबदारपणे खोल समुद्रात गेले. वेळीच जीवरक्षक व सुरक्षारक्षकांच्या सूचनेकडे लक्ष दिले असते तर कदाचित बुडण्याची वेळच आली नसती. एकूणच पर्यटकांचा अतिउत्साहीपणा व बेजबाबदारपणा आणि जीवरक्षक आणि सर्वच स्थानिक व्यावसायिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्याचे चित्र आजही दिसून येत आहे. या घटनेची माहिती मिळताच गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी सागर गिरी गोसावी व होमगार्ड अमेय शिवगण यांनी तात्काळ समुद्रकिनारी भेट देऊन बुडणाऱ्या पर्यटकांविषयी माहिती घेतली.

गेल्या अनेक दिवसांपासून गणपतीपुळे ग्रामपंचायतीने दहा जीवरक्षकांना ब्रेक दिल्याने जीवरक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच केवळ दोन जीवरक्षकांना गेल्या दहा दिवसापूर्वी गणपतीपुळे ग्रामपंचायतीने समुद्रकिनाऱ्यावर कामगिरीसाठी तैनात केले आहे मात्र या दोन जीव रक्षकांना समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात असणार्‍या पर्यटकांना थोपविण्याची जबाबदारी पेलता येणारी नाही .एकूणच दोन जीवरक्षक बुडणाऱ्यांना वाचविण्यात कमी पडू शकतात. त्यामुळे जीवरक्षकांची संख्या वाढविण्याची गरज असताना  गणपतीपुळे ग्रामपंचायतीने दोन जीवरक्षकांना ठेवून आठ जीवरक्षकांना कमी केल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरच आला आहे.