गणपतीपुळे:- रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी (वय वर्षे २६) राहणार मानखुर्द मुंबई असे त्याचे नाव आहे. तर भीमराज आगाळे (वय वर्षे २४) राहणार कल्याण मुंबई आणि विवेक शेलार (वय वर्षे २५) राहणार विद्याविहार मुंबई येथील या दोन तरुणांना वाचविण्यात स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यवसायिक, जीवरक्षक, पोलीस व ग्रामस्थ यांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथून आदर्श धनगर राहणार गोवंडी मुंबई वय वर्षे २६, प्रफुल्ल त्रिमुखी राहणार मानखुर्द मुंबई वय वर्षे २६, सिद्धेश काजवे राहणार परेल लालबाग मुंबई वय वर्षे २५, भीमराज आगाळे राहणार कल्याण मुंबई वय वर्षे २४ व विवेक शेलार राहणार विद्याविहार मुंबई वय वर्षे २५ असे कॉलेजचे मित्र असणारे पाच तरुण देवदर्शन व पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे सकाळच्या सुमारास आले होते. हे पाच तरुण गणपतीपुळे येथे एका खाजगी लॉज मध्ये निवासासाठी उतरले होते.









