
रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी सकाळी एक दुर्दैवी दुर्घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गटातील पाच जण समुद्राच्या लाटांमध्ये वाहून गेले. या घटनेनंतर प्रशासन आणि जीवरक्षकांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत पाचपैकी एका पर्यटकाचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. प्रेम दीपक आदमाने (वय १९, रा. बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) याचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला.
छत्रपती संभाजीनगर येथून पर्यटकांचा एक गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. शनिवारी सकाळी हे पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर असताना पाच जण समुद्राच्या पाण्यात गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि समुद्राच्या प्रवाहामुळे हे पाचही जण बुडू लागले. समुद्रात बुडालेल्या पाच जणांमध्ये आदित्य संतोष राऊत (वय वर्षे 22),अनिकेत बंडू हिवराळे (वय वर्षे 20), आनंद राजू नरवडे (वय वर्ष 20) ,प्रेम दीपक आदमाने (वय वर्षे 19), यश रामेश्वर कांबळे (वर्षे 19, सर्व राहणार बीडकिंन, जिल्हा संभाजीनगर ,तालुका पैठण) यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक जीवरक्षक आणि प्रशासनाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईकणकर यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून शोधकार्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुडालेल्या पाच पर्यटकांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून, उर्वरित चौघांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.










