रत्नागिरी:- गणपतीपुळे समुद्रात 25 ऑक्टोबर रोजी बेपत्ता झालेले पर्यटक नितीन शंकर पवार हे अद्याप सापडलेले नाहीत. त्यांना 1 नोव्हेंबर रोजी एक आठवडा पूर्ण झाल्याची माहिती जयगड पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांची युद्धपातळीवर शोध मोहीम जयगड पोलीसाकडून 15 ते 20 किलोमीटरच्या समुद्रकिनार्यावरील खडकाळ भागांमध्ये सुरू आहे.
पेण-रायगड या ठिकाणाहून गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी आलेले नितीन शंकर पवार हे कुटुंबीयांसह गणपतीपुळे समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. यावेळी त्यांचा अडीच वर्षाचा चिरंजीव आयांश याला समुद्रात बुडताना येथील फोटोग्राफर व्यावसायिक रोहित चव्हाण व पर्यटनाच्या निमित्ताने समुद्रावर आलेल्या बेळगावच्या डॉ. प्रणाली हरदारे यांच्या वैद्यकीय उपचारामुळे वाचवण्यात आले. नितीन पवार मात्र सापडलेले नाहीत. त्यांचा गेला आठवडाभर युद्धपातळीवर जयगड पोलिस ठाण्याच्या वतीने स्थानिक ग्रामस्थ, जीवरक्षक, ग्रामरक्षक दलाचे सदस्य, मालगुंड, गणपतीपुळे, वरवडे, रीळ ,उंडी आदी भागातील पोलिसपाटील यांच्या वतीने शोध सुरू आहे. मात्र अद्याप ते सापडले नसल्याने त्यांना शोधण्याचे पोलिसांसमोर एक मोठे आव्हानच निर्माण झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांकडून वेळोवेळी त्यांच्या शोधाची माहिती घेतली जात आहे. तसेच अधूनमधून ते गणपतीपुळे येथे दाखल होत असल्याचे सांगितले जाते, परंतु ते सापडत नसल्यामुळे नितीन पवार यांचे कुटुंबीयदेखील आता मोठ्या चिंतेत आणि दुःखाच्या सावटाखाली आले आहे.









