रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे येथे समुद्रात पोहण्यास उतरलेले पाच पर्यटकांपैकी चौघांना वाचवण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला. समुद्र सफरीसाठीच्या नौका आणि जेट स्कीमुळे बुडणार्या चार जणांना समुद्रातून वेळीच बाहेर काढणे शक्य झाले. हा प्रकार रविवारी (ता. 19) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला.
रत्नाकर कल्पनाथ सरोज (24) असे बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. तर गोलू समरजित सरोज (26),रोहित संजिवन वर्मा (23),कपील रामशंकर वर्मा (28),मयुर सुधीर मिश्रा (28, सर्व मुळ रा. उत्तर प्रदेश. सध्या रा. लोटे ता. खेड, रत्नागिरी) यांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले.
शासकीय सुट्टी असल्यामुळे गणपतीपुळेत पर्यटकांची मोठी गर्दी आहे. रविवारी सकाळी पाचही जणं लोटे येथून गणपतीपुळेत फिरण्यासाठी आले होते. देवदर्शन घेतल्यानंतर ते सर्व किनार्यावर आले. ते सर्व पोहण्यासाठी समुद्रात उरतले. लाटांमुळे पाण्यालाही करंट होता. ते पाचही जणं पोहत पोहत समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ लागले. किनार्यावरील काहींनी त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहण्याची सुचना केली होती. थोड्याचवेळात ते पाचही जणं पाण्यात बूडू लागले. हा प्रकार समुद्रात पर्यटकांची सैर घडवून आणणार्या बोटींग व्यावसायिकांच्या आणि जीवरक्षकांच्या लक्षात आली. त्यांनी बुडणार्या पर्यटकांजवळ जाऊन त्यांना बाहेर काढले. त्यातील रत्नाकर कल्पनाथ सरोज (वय, 24) हे खोल पाण्यात वाहून जात होते. गटांगळ्या खात असलेल्या सरोज यांना बोटिंग व्यवसायिक दिनेश सुर्वे यांच्या जेटस्कीच्या चालकाने पाण्याबाहेर काढले. त्यानंतर उर्वरितांना बोहर काढण्यात आले. पाण्याबाहेर काढल्यानंतर प्राथमिक उपचारासाठी जीव रक्षकांनी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तत्पुर्वी रत्नाकर सरोज यांचा मृत्यू झाला होता. तपासणीनंतर मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शांतनू वायकर यांनी रत्नाकर यांना मृत घोषित केले. पुढील कार्यवाहीसाठी रत्नाकर यांचा मृतदेह रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. बुडणार्या पर्यटकांना वाचवण्यासाठी जीवरक्षक ओमकार गावणकर, आशिष माने, अनिकेत राजवाडकर, मयुरेश देवरूखकर आदींची मोलाची मदत झाली. या घटनेची माहिती मिळताच गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक रेखा जाधव या पोलीस कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल मधुकर सरगर व सहकार्यांसह दाखल झाल्या होत्या.
कोरोनातील टाळेबंदी उठल्यानंतर चार महिन्यांपुर्वी एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने पोहण्यावर बंधने आणण्यासाठी पावले उचलली होती. भरतीच्यावेळी मंदिराच्या समोरील भागात चाळ निर्माण होते. त्यात पोहणारा अडकला तर त्याला जीव गमवावा लागतो. काहीवेळा पर्यटकांचा अतिउत्साहही कारणीभूत ठरत आहे.