रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी कुटुंबासह पेण-रायगड येथून आलेल्या पर्यटकातील तरुण अद्याप बेपत्ताच. पोलिस, जीवरक्षक व स्थानिकांकडून त्यांचा शोध सुरु आहे. नितीन शंकर पवार (वय ३५, रा. हमरापूर-पेण, जि. रायगड) असे गणपतीपुळे समुद्रात बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २५) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रायगड-पेण मधून पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले होते. हे कुटुंब समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरले होते. हे पिता-पुत्र बुडत असल्याचे लक्षात येताच अडीच वर्षाचा मुलगा- अयांश नितीन पवार याला फोटोग्राफर रोहित चव्हाण यानी वाचविले होते. मात्र त्याचे वडिल नितीन पवार हे समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले. अयांश याला वाचविल्यानंतर पर्यटनासाठी आलेल्या डॉ. प्रणाली हरदारे (भिवशी-निपाणी) यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व गणपतीपुळे येथील खासगी रिक्षाने ताबडतोब मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी पवार यांनी तत्काळ त्याच्यावर उपचार करुन त्याची प्रकृती स्थिर करण्याचे काम केले व अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले होते. त्याची प्रकृती स्थिर आहे. या बाबत अधिक तपास जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील व त्यांचे सहकारी तसेच गणपतीपुळे जीवरक्षक व्यावसायिक, ग्रामस्थ व पोलिस कर्मचारी शोध घेत आहेत. मात्र पाच दिवस उलटून गेले अद्यापही पर्यटक बेपत्ता नितीन पवार यांचा शोध सुरुच आहे.









