गणपतीपुळे पर्यटकांनी हाऊसफुल्ल; चार दिवसात 70 हजार पर्यटक दाखल

रत्नागिरी:- सलग चार दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांनी कोकणातील किनारे पर्यटकांनी फुलले होते. गणपतीपुळेत दररोज एकवीस हजार याप्रमाणे चार दिवसात 70 हजाराहून अधिक पर्यटकांनी गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. जिल्ह्यातील सर्वच किनारी भागांमध्ये पर्यटकांचा राबता होता. त्यामुळे सुट्टीचे दिवस व्यावसायिकांना सुगीचे ठरले.

शालेय परिक्षा संपल्यानंतर गुरुवारपासून (ता. 14) शासकीय सुट्ट्यांना आरंभ झाला. सलग सुट्ट्या आल्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्याच्या कानाकोपर्‍यातून हजारो पर्यटक कोकणातील किनार्‍यांकडे वळले होत. दापोली, गुहागर, रत्नागिरी तालुक्यातील किनार्‍यांवर पर्यटकांची गर्दी तिन्ही दिवस दिसत होती. कोरोनातील निर्बंध उठल्यानंतर प्रथमच जिल्ह्यातील पर्यटनस्थळं फुल्ल होती. प्रसिध्द गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी गुरुवापासून गर्दी वाढू लागली. मंदिरात झालेल्या नोंदीनुसार शुुक्रवारी 21 हजार, शनिवारी 21 हजार 500, रविवारी 22 हजार पर्यटकांनी दर्शन घेतले. किनार्‍यावरही प्रचंड गर्दी होती. बहूसंख्य पर्यटक दर्शनाबरोबरच आरेवारे, नेवरे, भंडारपुळे किनार्‍यावर फिरण्यासाठी जात होते. कोरोनानंतर कोकणात पर्यटनासाठी येणार्‍यांची संख्या घटलेली होती. एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे हॉटेल, लॉजिंगसह छोट्या-मोठ्या फेरीवाल्यांना चांगलाच फायदा झाला आहे. या चार दिवसांमध्ये एक कोटीच्या सुमारास उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मंगळवारी (ता. 19) अंगारकी चतुर्थी असल्यामुळे सेामवारपासूनच गणपतीपुळे भक्तांची ये-जा सुरु होणार आहे. या कालावधीत सर्वाधिक भक्त हे पश्‍चिम महाराष्ट्रातील असतील. एसटी वाहतूक सुरु झाल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढणार आहे. या कालावधीमध्येही फेरीवाल्यांना मोठा फायदा होणार आहे.