गणपतीपुळेत 31 भाग्यवंतांना मिळाला दर्शनचा लाभ 

रत्नागिरी:-  ‘एक गाव एक गणपती’ची पाचशे वर्षांपुर्वीची परंपरा कायम राखण्यासाठी कोरोनातील नियमांचे पालन करत गणपतीपुळे मंदिरात प्रत्येक गावातील 25 जणांना मुख दर्शन देण्यास प्रशासनाने परवानगी दिली. त्यानुसार नेवरेतील 17 तर भगवतीनगरमधील 14 ग्रामस्थांनी मुख दर्शन घेतले; परंतु अटी-शर्थींमुळे गणपतीपुळे, मालगुंड, भंडारपुळेतील ग्रामस्थांना दर्शन घेता आले नाही.

गणपतीपुळे येथे ‘एक गाव एक गणपती’ ही अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. गणपतीपुळे, नेवरे, मालगुंड, वरवडे, भगवतीनगर या पाच गावात ही प्रथा अजुनही सुरू आहे. या पंचक्रोशीत अनेकांच्या घरी गणपती आणला जात नाही. गणपती मंदिरांतील गणपती हाच घरातील गणपती मानून त्याचे दर्शन घेतात. मात्र गेल्या वर्षी कोरोनामुळे या सार्‍यांवर बंधन आले होते. यंदाही कोरोनामुळे अजुनही मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर पाच गावांतील प्रत्येकी 25 ग्रामस्थांना गणपतीपुळे मंदिराच्या पश्‍चिमेकडील दरवाजाकडून दर्शन देण्यास परवानगी मिळाली. त्या ग्रामस्थांनी फुलोरा आणि तिर्थ घेऊन गावातील अन्य कुटूंबांना वितरीत करावयाचे होते. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता. 10) सकाळी गणपतीपुळे मंदिर व्यवस्थापनाने पश्‍चिम द्वाराकडील दरवाज्यातून श्री गणरायाचे मुख दर्शनाची व्यवस्था केली होती. पाच गावांसाठी प्रत्येक एक तासाचा कालावधी होता. सकाळी 9 ते 12.30 या कालावधीत नेवरे, भगवतीनगर या दोन गावातील ग्रामस्थांनी दर्शनासाठी उपस्थिती दर्शवली. त्यांना फुलोरा आणि तिर्थ देण्यात आले; परंतु उर्वरित गावातील लोकांना अटींमुळे दर्शन घेता आले नाही. भंडारपुळे ग्रामस्थांनी एका पत्राद्वारे गावातील प्रत्येक घरातील एका व्यक्तीला मंदिरात जाऊन गणेशाचे स्पर्श दर्शन व देवळातील फुलोरा, तिर्थ घेऊन येण्याची मागितलेली परवानगी प्रशासनाने मान्य केली नव्हती. एवढ्या मोठ्या गावातून पंचवीस जणं निवडण्याचे ग्रामपंचायतींपुढे आव्हानच होते. अटी-शर्थींमुळे ग्रामस्थांना दर्शन घेता आलेले नाही.