नव्या वर्षाचे स्वागत; वाजतगाजत श्रींची पालखी मिरवणूक
रत्नागिरी:- तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे नववर्षाच्या प्रथम दिनी चैत्र प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला मालगुंड येथील रहिवासी अनंत सुधाकर मोरे आणि परिवार यांच्याकडून श्री चरणी २१ डझन आम्रफळांची आरास करण्यात आली. संस्थान श्री देव गणपतीपुळेचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांच्यामार्फत ही आरास करण्यात आली.
रविवारी गुढीपाडव्यानिमित्त संस्थानतर्फे श्रींच्या पालखी मिरवणुकीत विविध ठिकाणाहून आलेले भाविक, पर्यटक आणि स्थानिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत मंदिराच्या प्रदक्षिणामार्गे श्रींची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच मंगलमुर्ती मोरयाचा जयघोष करण्यात आला.