गणपतीपुळेत माघी गणेशोत्सवाला आरंभ

भक्तगणांनी दर्शनासाठी गर्दी ; २८ पर्यंत कार्यक्रमांची रेलचेल

रत्नागिरी:- तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिरात माघी गणेशोत्सवाला उत्साहात सुरवात झाली. पहिल्या दिवशी स्थानिक ग्रामस्थांसह परजिल्ह्यातून आलेल्या भक्तगणांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हा उत्सव २८ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे.

गणेशोत्सवासाठी गणपतीपुळेमध्ये रविवारी सकाळी श्रींची महापुजा झाली. सकाळी विधिवत गणेशयाग देवता स्थापन करण्यात आली. या उत्सवासाठी मंदिराच्या सभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पुजेनंतर गणेशयाग केला गेला. मंदिराचे सरपंच विनायक राऊत आणि सौ. राऊत यांनी महापुजा केली. या उत्सवासाठी संस्थान श्रीदेव गणपतीपुळेतर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कोरोनातील परिस्थितीमुळे मागील दोन वर्षे गर्दी टाळण्यासाठी भक्तगणांना दर्शन घेता आले नव्हते. रविवारी (ता. २२) शासकीय सुट्टी असल्यामुळे अनेक भक्तगण दर्शनासाठी आणि फिरण्याच्या उद्देशाने गणपतीपुळे दाखल झाले होते. दुपारपर्यंत मंदिरात रांगाच्या रांगा लागलेल्या होत्या. सायंकाळी ७ वाजता सामुदायिक आरती झाली. हा उत्सव २८ जानेवारीपर्यंत सुरुच राहणार आहे. २३ ला सकाळी ७ ते १२ या वेळेत मंदिराच्या कलशारोहण वर्धापनदिनानिमित्त गणेशयाग पूर्णाहूती, तसेच २२ ते २६ या कालावधीत सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत कीर्तनकार हभप मोहक प्रदीप रायकर-डोंबिवली यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. २४ ला सकाळी ११ ते १२ या वेळेत सहस्त्र मोदक समर्पण. बुधवारी (ता. २५) सायंकाळी ४ वाजता श्रींची पालखी मिरवणूक (प्रदक्षिणा) माघी यात्रा होईल. २६ ला सायंकाळी ७ वाजता सामुदायिक आरती व मंत्रपुष्प, शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी ७.३० वाजता शास्त्रीय, अभंग, नाट्यसंगीताची सुरेल मैफल स्वरार्पण सादरकर्ते श्रीधर पाटणकर, करुणा पटवर्धन- रत्नागिरी. २८ ला दुपारी ११.३० ते २ या वेळेत महाप्रसाद रथसप्तमी. याच दिवशी रात्री १० वाजता श्री गणेश प्रासादिक नाट्यमंडळ गणपतीपुळेचे विनोदी नाटक हसवाफसवी कार्यक्रम होणार आहे. या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद गणेशभक्तांनी घ्यावा, असे आवाहन संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांनी केले आहे.