गणपतीपुळेत मंदिरासह पर्यटनाचे दारही उघडले

गणपतीपुळेत पर्यटकांनी फुलले; लाखांची उलाढाल

रत्नागिरी:-दिवाळी सरता सरता मंदिरे दर्शनासाठी खुली केल्यामुळे धार्मिक पर्यटनस्थळी दर्शनातुर भक्तांची गर्दी वाढली. प्रसिद्ध गणपतीपुळेमध्ये गेल्या दोन दिवसात आठ हजाराहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. किनारे फुलल्यामुळे परिसरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे चेहरे खुलले. गुजरातसह पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीतील पर्यटकांनी हजेरी लावली. तीन दिवसात दहा हजार पर्यटकांनी हजेरी लावली असून सुमारे पंधरा ते वीस लाखांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

सोमवारपासून (ता. 16) श्रींचे दर्शन घेण्याबरोबर नवस फेडण्यासाठी गणपतीपुळे मंदिरात सकाळपासून भक्तगण हजर होते. त्यात सानथोर होते. पहिल्या दिवशी सुमारे चार हजारजणांनी दर्शन घेतले. बुधवारपासून संपूर्ण जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर गर्दी वाढू लागली आहे. देवाचरणी लीन होण्याची संधी मिळाल्याने भाविकांत समाधान होते. पहिल्या दिवशी पश्‍चिम महाराष्ट्रातील पर्यटकांचा भरणा होता. एमटीडीसीतील निवास व्यवस्थेसह लॉजिंग, निवास न्याहरीतील व्यावसायिकांकडे 40 टक्केच पर्यटक वळले. विनायकी चतुर्थीमुळे गणपतीपुळेमध्ये मागील दोन दिवसांपेक्षा अधिक पर्यटक दिसत होते.
दर्शन घेऊन आलेले पर्यटक आनंद लुटण्यासाठी किनार्‍याकडे वळत होते. समुद्रात बोटींच्या सैरसाठी सर्वाधिक कल होता. समुद्र स्नानासह वाळूमध्ये उंट, घोड्यांवरून सैरही सुरू होती. टाळेबंदीने अडचणीत आलेल्या व्यापार्‍यांना यामुळे दिलासा मिळाला. फेरीवाल्यांसह हॉटेल, लॉजिंगवाल्यांचे चेहरे खुलले आहेत. दिवाळी सुट्टीचा हा आठवडा पर्यटन व्यावसायिकांना अच्छे दिन ठरणार. देवस्थानच्या भक्तनिवासात 33 टक्के खोल्या वापरात आहेत. दररोज 25 पर्यटक तिथे येतात. उर्वरित लॉजिंग व्यवस्थेतही चाळीस टक्केच पर्यटकांचा राबता आहे. सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला असून मास्क वापरणार्‍यांचे प्रमाण कमी आहे.