रत्नागिरीः– प्रसिध्द धार्मिक स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील ग्रामपंचायतीने आपले अधिकारात बाहेरील पर्यटकांना निवासस्थान भाड्याने दिल्यास 10 हजार रुपये दंड वसूल करण्याच्या नोटीसा संबंधित लॉज व्यवसायिकांना दिल्याने या व्यवसायिकांत खळबळ माजली आहे.
जिल्ह्यात ग्रामकृतीदल कार्यरत करण्यात आल्या आहेत.कोरोना उच्चाटनासाठी ठिकठिकाणी या दलाचे कार्य कौतुकास्पद आहे.मात्र ग्रामपंचायत सरपंच तथा ग्रामकृतीदल अध्यक्ष यांना हा मोठ्या रक्कमेचा दंड ठोठावण्याचा अधिकार कुणी दिला? कोणत्या आधारे हा दंड जाहीर करण्यात आला आहे? कोविड 19 अनुषंगाने कारवाई कुणाला करता येते? अशी विचारणा करीत काही व्यवसायिकांनी दूरध्वनी द्वारे महाराष्ट्र समविचारी मंचशी संपर्क साधला. हे व्यवसायिक स्थानिक रहिवासी आहेत. अनेकदा पर्यटक स्वतःहून येतात. रात्री अपरात्री आलेले पर्यटक निवासासाठी गयावया करतात. मग नाईलाजास्तव या बाहेरील व्यक्तींना निवास व्यवस्था द्यावी लागते. यातील कोणताही व्यवसायिक पर्यटक यावेत म्हणून प्रयत्न करीत नाही वा जाहिराती करीत नाही.
कोरोनाचे कडक निर्बंध पालन करण्यात गणपतीपुळे अग्रेसर आहे. दंडात्मक कारवाईचे शासकीय निर्देश काय आहेत. किती दंड आकारणी करावी याविषयी सविस्तर माहिती घेऊन ग्रामपंचायतीच्या या दंडात्मक धोरणावर कायदेशीर दाद मागण्याचा प्रयत्न करु. असे समविचारी मंचचे प्रमुख बाबा ढोल्ये आणि राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांनी संबंधित व्यवसायिकांना सांगितले. दरम्यान खाजगी व्यवसायिकांना दंडात्मक कारवाई करण्याचा फतवा काढणा-या याच गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या अधिकारात आणि कार्यक्षेत्रांंत असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा व्यवसाय निर्धास्तपणे सुरु असल्याचे तक्रार काही व्यवसायिकांनी केली आहे.पर्यटन महामंडळाला नियम अटी नाहीत का? जो न्याय खाजगी व्यवसायिकांना तोच न्याय सर्वांना दिला जावा अशी मागणी केली जात आहे.सर्व लॉजधारकांनी समविचारी मंचच्या झेंड्याखाली एकत्र येऊन याविरोधात कायदेशीर न्याय मागण्याचे ठरविले असल्याचे प्रमुख व्यवसायिकांनी स्पष्ट केले.