रत्नागिरी:- गटारीच्या ओल्या पार्टीत मस्करीवरून तुफान हाणामारी झाली. दोन साडू एकमेकांना भिडले. लाठ्याकाठ्यांचा मुक्त वापर करत एकमेकांंचे ढुंगण फोडले. राजकीय मित्रांच्या या पार्टीत काही क्लासवन दर्जाचे अधिकारीदेखील सहभागी झाले होते. या हाणामारीत एक बडा पदाधिकारी जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री एमआयडीसी परिसरात घडली.
रत्नागिरीच्या एमआयडीसी परिसरात बुधवारी रात्री एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. एका बड्या नेत्याच्या उपस्थितीत ही पार्टी होणार होती. त्यासाठी राजकीय पटलावरील नेत्याच्या जवळचे बरेचसे मित्रपरिवार आणि काही सरकारी अधिकारी यांना पार्टीचे खास निमंत्रण देण्यात आले होते. या पार्टीतच तू तू-मै मै सुरू झाली आणि बघता बघता तुफान हाणामारी झाली.
झणझणीत मटण व सोबत इंग्लिश दारू
या पार्टीसाठी प्रत्येकाच्या आवडीनुसार मेनू मागविण्यात आले होते. यामध्ये झणझणीत मटणाचादेखील मेनू होता तर प्रत्येकाच्या फर्माईशनुसार इंग्लिश दारूची व्यवस्था करण्यात आली होती. बडे अधिकारी या पार्टीला उपस्थित असल्याने अनेकांना आपण नेत्याच्या किती जवळ आहोत हे दाखविण्याचा मोह आवरला नाही.
एमआयडीसी परिसरात या पार्टीला सुरूवात झाली. बघता बघता ओली पार्टी चांगलीच रंगात आली होती. पार्टीसाठी खास साऊंड व्यवस्थादेखील करण्यात आली होती. ‘ओंकारा’च्या गीताने या पार्टीला सुरूवात झाली. बघता बघता पार्टी चांगलीच रंगात आली. राजकारणात काम करणारे अनेक मित्र या पार्टीत सहभागी झाले होते.
ही पार्टी सुरू असतानाच बड्या नेत्यासोबत सावलीसारखा फिरणारा एक पदाधिकारी अनेकांच्या डोळ्यात खुपत होता. या पदाधिकार्यामुळे आपल्या मित्राचे अस्तित्व धोक्यात आले असा समज काहींनी केला होता. त्यातून त्या पदाधिकार्याला मस्करीतून डिवचण्यात आले आणि तुफान राड्याला सुरूवात झाली.
सुरूवातीला पार्टीत तू तू – मै मै सुरू झाली. एकमेकांना आव्हाने देण्यात आली. बघता बघता बुकलाबुकली सुरू झाली. आता तुला बघूनच घेतो असे सांगून त्या पदाधिकार्याने आपल्या भावाला कॉल केला आणि काही क्षणात त्या पदाधिकार्याचा भाऊ आपल्या पंटर लोकांना घेऊन घटनास्थळी पोहोचला.
या पार्टीत एक तरूण ज्याच्यावरून वादावरून सुरूवात झाली तो नेहमीच आपण अजिंक्य आहोत. आपल्यावर जय कोणी मिळवूच शकत नाही अशा अविर्भावात वावरणार्या त्या तरूणाला बाहेरून आलेल्या तरूणांनी तुफान रगडले. हातात भेटेल त्या वस्तूने त्या तरूणाला मारहाण केली.
तरूणाला मारहाण झाल्यानंतर त्या तरूणाने आपल्या साथीदारांना कॉल केला आणि झालेल्या मारहाणीची माहिती दिली आणि मग काय? त्या तरूणाचे मित्रदेखील सुसाट वेगाने एमआयडीसी परिसरात दाखल झाले आणि दोन गटात फिल्मीस्टाईल हाणामारीला सुरूवात झाली.
दोन गट आमनेसामने आल्यानंतर सार्यांच्याच अंगात आक्काबाई संचारून आली. हातात काठ्या, दांडू घेऊन एकमेकांवर चाल केली. काहींनी तर एकमेकांच्या ढुंगणावर दंडुक्याचे फटके मारले आणि ढुंगणच फोडून काढल्याची चर्चा त्या परिसरात सुरू झाली.
बड्या नेत्यासोबत असणारा तो पदाधिकारी आणि मारहाण झालेला तरूण यांच्यात चांगलीच जुंपली होती. अखेरीस त्या तरूणाने हातात फाईट घालून त्या पदाधिकार्याच्या गालावर जोरदार हल्ला केला आणि पदाधिकार्याला जखमी केले.
गटारीच्या ओल्या पार्टीसाठी काही बडे अधिकारीदेखील सहभागी झाले होते. या अधिकार्यांच्या समोरच फिल्मीस्टाईल धुलाई सुरू झाली होती. काही अधिकार्यांना तर टराटर घाम फुटला होता. यांच्या भानगडीत आपल्यावर फटके पडतील या भीतीने काही अधिकारी तेथून खोट लावून पळाल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.
त्या पदाधिकार्याचा राईट हॅण्ड म्हणून ओळखला जाणारा सोशल मिडियावरचा एक युवा नेता आपल्या सहकार्यांना घेऊन घटनास्थळी आला होता तर काहींनी कोकणनगर परिसरातून पोरं बोलवली होती. दोन्ही बाजूने तुफान शक्तीप्रदर्शन सुरू होते. त्यातच हा सोशल मिडियावरील नेता त्या ठिकाणी आला. अरेरावी करू लागला. मग काय… या युवा नेत्यालादेखील चांगलेच रगडण्यात आले.
या युवा नेत्यावर हात पडताच सार्यांनी आपले हात साफ करायला सुरूवात केली. तो युवा नेता बेंबीच्या देठापासून ओरडत होता. कशीबशी आपली सुटका करून घेतल्यानंतर त्या युवा नेत्याने आपली गाडी तेथेच टाकून पळ काढला. त्याचे सहकारीदेखील घटनास्थळावरून काही क्षणात गायब झाले.
या हाणामारीत नुकताच एका पक्षात प्रवेश केलेला रत्नागिरीतील बडा पदाधिकारी जखमी झाला असून त्याला सात टाके पडले असल्याची माहिती पुढे आली आहे. त्या पदाधिकार्याला रातोरात एका खासगी रूग्णालयात दाखल केल्याची माहिती पुढे आली आहे.
तो तरूण आणि पदाधिकार्याचा भाऊ हे साडू साडू असून दोन साडू एकमेकांना भिडल्याने पार्टीत सहभागी झालेल्यांच्या नजरा वठारल्या होत्या. एकमेकांना तुफान मारहाणदेखील त्यांनी केली. तू असशील भाई, तुझ्या घरचा… आम्हाला धाक दाखवायचा नाही असे सांगून दोन साडू एकमेकांना भिडले होते.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र नेहमीप्रमाणे पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. खरेतर पोलिसांनी या प्रकरणात स्वतःहून कारवाई करणे गरजेचे होते मात्र राजकीय पार्टी असल्याने या पार्टीला पोलिसांचे अभय मिळाल्याची चर्चा आता जोरदारू सुरू आहे.









