खैर-ए-उम्मत फाऊंडेशन महाराष्ट्रातील आदर्श फाउंडेशन ठरेल: ना. सामंत

रत्नागिरी:- रत्नागिरी येथील खैर-ए-उम्मत फाऊंडेशन मिरकरवाडा यांच्यावतीने स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून आरोग्य शिबिर रत्नागिरी मिरकडवाडा येथे आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम नगर परिषद शाळा नं. 10, मिरकरवाडा येथे पार पडला.

रत्नागिरीकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही जो चांगला उपक्रम हाती घेतला आहे त्या उपक्रमाला पालकमंत्री या नात्याने शुभेच्छा देतो आणि भविष्यात खैर-ए-उम्मत फाऊंडेशन महाराष्ट्रातील आदर्श फाउंडेशन ठरेल असे मत व्यक्त करतो असे मत ना. सामंत यांनी व्यक्त केले. देशभक्त मुस्लिम बांधव बघायचे असेल तर माझ्या रत्नागिरीत या असे भावनिक आव्हान देखील पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी केले. देश सेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि ती सेवा अल्लाची सेवा आहे असे मानणारे मुस्लिम बांधव आज माझ्या रत्नागिरीत आहेत त्याचा मला सार्थ अभिमान असल्याचे गौरव उद्गार या कार्यक्रमानिमित्त त्यांनी काढले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला जामा मशिदीचे इमाम मौलाना बिलाल यांनी कुरआन पठण केले. यानंतर विविध उपक्रमांना सुखात झाली, नेक्स लाइफ डायग्नॉस्टिक सेंटर तर्फे नगरपरिषद रत्नागिरीतील शाळा क्र. १० येथे मिरकरवाडा आणि परिसरातील शुगरपीडित रुग्णांसाठी मोफत रक्त तपासणी करण्यांत आली. या उपक्रमात सानिया वाडकर आणि वेदांगी ठावरे यांनी सुमारे ५२ रुग्णांची रक्त तपासणी केली. इन्फिगो आय केअरतर्फे डॉ. मोहम्मद इमरान सिद्दिकी आणि डॉ.साहिलचीर खान यांनी १३९ रुग्णांची डोळे तपासणी करून पुढील मार्गदर्शन केले. सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन आणि फिजीशियन डॉ. शेख यांनी ५० रुग्णांची तपासणी केली. इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा रत्नागिरीच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित करण्यांत आले. यात एकूण ४३ तरुणांनी रक्तदानाचे कार्य केले.

याच दिवशी सागर मोरे, श्रीम. मानसी झापडेकर आणि साईनाथ भारकर यांनी आभा कार्ड बनवण्याची मोहीम पार पाडली. एकाच दिवशी 900 आभा कार्ड तयार करून नागरिकांना त्या संदर्भात माहितीही पुरविण्यांत आली. दुपारी उशिरापर्यंत सुरू असलेल्या या शिबिरांमध्ये सुमारे ३८९० रुग्ण आणि नागरिकांनी लाभ घेतला. या उपक्रमाला यशस्वी करण्याकरिता माजी नगरसेवक सुहेल सारखरकर, ताबिश साखरकर, अकबर होडेकर, मसवूद मुकादम, पांजरी मोहल्ल्यातील तरुण मंडळी, खैरे उम्मत फाउंडेशन चे अध्यक्ष रहीम करीम अकबर अली, उपाध्यक्ष नुरुद्दीन पटेल, इक्बाल खान, जुनैद होडेकर, अ. करीम मजगांवकर, सलाहुद्दीन सोलकर, जाकिर जागिरदार, यासीन मजगांवकर, हनीफ महालदार, इमरान मुकादम, मुनीर सोलकर, युसुफ दर्वे, मझहर मुकादम आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमा चे सूत्रसंचालक सिराज खान यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.