रत्नागिरी:- शिवछत्रपती पुरस्कार विजेती ऐश्वर्या सावंत हीचा आदर्श समोर ठेवून सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवावा आणि जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. खेलो इंडीयासारख्या स्पर्धा खेळताना जास्तीत जास्त खेळाडूंनी शिवछत्रपती पुरस्कार मिळवण्याचे ध्येय बाळगावे, असे प्रतिपादन युवा उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी केले. या स्पर्धेत मुला व मुलींच्या आठ संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तसेच विजयी, उपविजयी आणि उत्कृष्ट खेळाडूंसाठी संगमेश्वर राजवाडी येथील पेम संस्थेतर्फे चषक ठेवण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणावर जिल्हा क्रिडा कार्यालयामार्फत आयोजित खेलो इंडिया स्पर्धेसाठीच्या जिल्हास्तरीय निवड चाचणीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळू साळवी, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरावडेकर, क्रीडाअधिकारी विशाल बोडके, स्पर्धाप्रमुख विनोद मयेकर, पंकज चवंडे, पंचप्रमुख राजेश कळबंटे, शिवछत्रपती पुरस्कार विजेती ऐश्वर्या सावंत, प्रसाद सावंत, राजेश चव्हाण यांच्यासह विविध संघांचे प्रशिक्षक व शिक्षक उपस्थित होते.
याप्रसंगी श्री. मलुष्टे म्हणाले की, गेली अनेक वर्षे खो-खो खेळामध्ये सातत्याने राष्ट्रीयस्तरावर खेळाडू चमकत आहेत. त्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय त्यांच्या मागे निश्चितच उभे राहील. जिल्हा खो-खो असोसिएशनचे सर्व पदाधिकारी खेळाडूंना घडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्याचेच फळ आज मिळत आहे.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ खेळाडू बाळू साळवी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की पुढील वर्षी याच ठिकाणी खो-खोची दोन मैदान तयार असतील त्याचप्रमाणे खो-खो खेळासाठी व खेळाडूंसाठी आवश्यक असणार्या सोयी सुविधा निर्माण झालेल्या दिसतील. खेळाडूंनी चांगला खेळ करताना, जिल्ह्याचे नाव रोशन करावे. तर जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोरावडेकर यांनी खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट खेळ करतानाच विभाग, राज्य स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आभार क्रीडाअधिकारी विशाल बोडके यांनी मानले.









