खेड शिवसेनेचे पदाधिकारी मोहन आंब्रे यांच्या मृत्यूप्रकरणी बुलेट चालकावर गुन्हा

खेड:- तालुक्यातील चिरणी येथील गडबडा/दांडा नदीवरील पुलावर दोन बुलेटची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात ५३ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोहन मनोहर आंब्रे (५३, रा. लोटे नवीन वसाहत, मूळ रा. चिरणी खालचीवाडी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर दुसऱ्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आदित्य दिलीप मोरे (२०, रा. आंबडसपेठ, ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, १७ जून २०२५ रोजी दुपारी १:५० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मयत मोहन मनोहर आंब्रे (वय ५३, रा. लोटे नवीन वसाहत, मूळ रा. चिरणी खालचीवाडी, ता. खेड) हे त्यांच्या चिरणी येथील घरातील काम आटोपून लोटे येथील घराकडे ( एम.एच. ०८ एयु ३४९५) बुलेटने निघाले होते. ते चिरणी शहीद स्मारकाच्या पुढील बाजूस असलेल्या गडबडा/दांडा नदीवरील पुलावर पोहोचले. त्याचवेळी, लोटे बाजूकडून भरधाव वेगात (एम.एच. ०८ ए.के. २२११) बुलेटवरून आलेला संशयित चालक आदित्य दिलीप मोरे (वय २०, रा. आंबडसपेठ, ता. खेड) याने आपल्या ताब्यातील बुलेट हयगयीने आणि बेदरकारपणे चालवली. विशेष म्हणजे, आरोपीच्या बुलेटचा विमा (इन्शुरन्स) संपलेला होता. आदित्य मोरेने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, चिरणी बाजूकडून डाव्या बाजूने येणाऱ्या मोहन मनोहर आंग्रे यांच्या बुलेटला समोरासमोर धडक दिली.

या भीषण धडकेत मोहन मनोहर आंब्रे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात आदित्य मोरेलाही किरकोळ दुखापत झाली असून, दोन्ही बुलेटचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेची फिर्याद खेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय संभाजी भोसले यांनी दिली आहे. त्यानुसार, २१ जून २०२५ रोजी खेड पोलीस ठाण्यात आदित्य दिलीप मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.