खेड येथे आयशरच्या धडकेत पादचारी जागीच ठार

खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणा-शिंदेवाडीजवळ जाधव पेट्रोल पंपासमोर झालेल्या एका भीषण अपघातात आयशर टेम्पोच्या धडकेमुळे एका पादचारी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडला.

या घटनेबाबत मनिष मंगेश साळुंखे (वय २०, रा. शिरवली सुतारवाडी, ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांचे काका विठोबा पांडुरंग साळुंखे (वय ३८, रा. शिरवली सुतारवाडी, ता. खेड) हे रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास गोवा ते मुंबईकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग पायी ओलांडत होते.

त्याच वेळी गोवा ते मुंबईकडे भरधाव वेगात निघालेला आयशर टेम्पो (क्र. एम.एच.०८-ए.पी. ६९८९) वरील चालक राजेश विजय मुकनाक (वय ३९, रा. उधळे खुर्द, ता. खेड) याने आपले वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवले. या भरधाव टेम्पोने विठोबा साळुंखे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात विठोबा साळुंखे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

खेड पोलीस ठाण्यात आरोपी चालक राजेश मुकनाक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.