रत्नागिरी:- मनमानी कारभार, लोकप्रतिनिधींना अपमानास्पद वागणूक असा ठपका ठेवत खेडमधील एका शाखा अभियंत्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. या अभियंत्याला सक्तीच्या रजेवर तसेच त्याची विभागीय चौकशी लावण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेच्या बैठकीत घेण्यात आला.
जि.प.च्या हिंदू सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे सभागृहात सोमवारी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर, समाजकल्याण सभापती पर्शुराम कदम, जि.प. सदस्य रचना महाडिक, स्वरुपा साळवी, संतोष थेराडे, अण्णा कदम, रोहन बने, बाळकृष्ण जाधव, विनोद झगडे आदी उपस्थित होते. ही सभा या बॉडीची शेवटची ठरणार आहे. कारण 20 मार्च रोजी यांची मुदत संपत आहे. यानंतर जि.प.वर प्रशासक लागणार आहेत. त्यामुळे या सभेकडे लक्ष लागले होते.
सभेत खेडमधील शाखा अभियंता खाचे यांच्या वर्तनाबाबत जोरदार हंगामा झाला. मंडणगड, दापोली, खेड या तालुक्यातील सर्व सदस्य आक्रमक बनले होते. हा शाखा अभियंता लोकप्रतिनिधींना अपमानास्पद वागणूक देतो. तसेच मनमानी कारभार करतो, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. शेवटी या अभियंत्याला मंगळवारपासून सक्तीच्या पाठवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच त्याची विभागीय चौकशीसुद्धा करण्याचे ठरवण्यात आले. येत्या आठवडाभरात ही चौकशी पूर्ण होईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी सांगितले.
वर्षभरापूर्वी झालेल्या वादात अनेक शाळांच्या इमारतींचे नुकसान झाले होते. विशेषकरून मंडणगड, दापोली, खेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान होते. शासनाकडे 8 कोटी रुपये मागण्यात आले होेते. मात्र शासनाने अडीच कोटी रुपयेच दिले. यावरूनसुद्धा सदस्य आक्रमक बनले होते. जिल्हा नियोजन तसेच शासनाकडे पुन्हा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सुगम, दुर्गम शाळांचा विषयही सभेत ऐरणीवर आला होता. योग्य पडताळणी करूनच अंतिम यादी जाहीर करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.