खेडशी येथे गोवंश हत्या झाल्याच्या शक्यतेने तणाव

रत्नागिरी:- शहरातील खेडशी येथील मातोश्री नगर परिसरात शनिवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास वासराचे तुटलेले अवशेष आढळून आल्याने खळबळ उडाली. याच परिसरात एका इमारतीच्या खाली वासराचा पाय देखील आढळून आला, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, वासराची हत्या झाली आहे की अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान, ही माहिती मिळताच तेथे हिंदू संघटनांचे पदाधिकारी, नागरिक, गोरक्षक आणि त्या पाठोपाठ पोलीस दाखल झाले. या प्रकरणी घटनास्थळीच या अवशेषांचा पंचनामा केला पाहिजे अशी मागणी गोरक्षकानी केल्यानंतर तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं. हे अवशेष एका नवजात वासराचे असल्याचे यावेळी स्पष्ट झालं. तसंच ते कोणीतरी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी कापून तेथे टाकले असल्याचा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आला आहे.याप्रकरणी विशाल पटेल यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध तक्रार दिली असून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 299, 325, 238 तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 5अ, 5ब आणि 9 यानुसार 19 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून 44 मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे रत्नागिरी शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिक वेगवेगळ्या चर्चा करत आहेत. पोलीस सर्व शक्यतांचा विचार करून तपास करत आहेत.

जुलै 2024 च्या घटनेनंतर पुन्हा संताप

दरम्यान 4 जुलै 2024 रोजी एमआयडीसी येथील मुख्य रस्त्यावर वासराचे शिर आढळून होते. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. वासराचे मुंडके पाहून हळहळ व्यक्त होत होती. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. दोषींवर कारवाईसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले. निवेदन देण्यात आले. पोलिसांकडून चालढकलपणा करण्यात येत होता. मात्र आमदार निलेश यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी शादाब बलबले नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्याला ८ दिवसांची पोलिस कोठडी ही झाली होती.त्याच्याकडे तालुक्यात वेतोशी या ठिकाणी गुरे बांधून ठेवून हाल करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.याचे सारे पुरावे कोर्टात सादर करण्यात आले होते. या घटनेनंतर 9 महिन्यांनी आता पुन्हा तोच प्रकार समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. काल शनिवारी रात्री या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वासराची हत्या करण्यात आली आहे की अन्य काही कारण आहे याची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.