रत्नागिरी:- शहराजवळील खेडशी-गयाळवाडी फाटा येथे निष्काळजीपणे दुचाकी स्वाराने एसटीला समोरुन धडक दिली. या अपघात प्रकरणी स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन मधुकर वाडकर (वय ३९, निळमणी आर्केड, गयाळवाडी, रत्नागिरी) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ४) दुपारी सव्वाचारच्या सुमारास खेडशी गयाळवाडी फाटा येथील रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित वाडकर हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एआर १३०८) घेऊन रत्नागिरी ते हातखंबा असे जात असताना गयाळवाडी येथे एका दुकानाच्या समोर दुचाकी निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या विरुद्ध बाजूस जाऊन हातखंबाहून येणाऱ्या एसटी (क्र. एमएच-१४ बीटी २५३५) ला समोरुन ठोकर दिली. या मध्ये स्वार वाडकर जखमी झाला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल महेंद्र खापरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.