रत्नागिरी:- रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी मंदीर रस्त्यावर मोटार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दाम्पत्य जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शशिकांत गजानन सनगरे (वय ३७ रा. हातखंबा ) व जान्हवी शशिकांत सनगरे (वय ३२) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता. १४) सायंकाळी पाचच्या सुमारास खेडशी महिलक्ष्मी मंदिर येथील सुचना फलका जवळ घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शशिकांत सनगरे हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एफ ०४१३) सोबत पत्नी जान्हवी हिस मागे बसवून सायंकाळी हातखंबाहून रत्नागिरीकडे येत होते. ते खेडशी येथील महालक्ष्मी मंदिर येथील रस्त्यावर आले असताना दिशा दर्शक (डायव्हर्शन) येथे मागून येणारी मोटार (क्र. एमएच-०८ एएक्स ८२८७) वरिल चालक ओमकार रवींद्र मांडवकर (वय ३१, रा. गोळप, ता. जि. रत्नागिरी) यांना दिशादर्शक (डायव्हर्शन) न कळल्याने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरिल दाम्पत्य शशिकांत व जान्हवी सनगरे ही दोघ गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, मोटार आणि दुचाकीचा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. मोटारीचे बॉनेट व दुचाकीची दुरवस्था झाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यत सुरु होती. या अपघातानंतर मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले होते.









