विभागात ४४ लाखांची थकबाकी ; कर्मचाऱ्यांचा सत्कार
खेड:- महावितरणच्या खेड विभागीय कार्यालयाने मार्चअखेरीस १६ कोटी ८१ लाखांच्या उद्दिष्टांपैकी ९९.४१ टक्के वीजबिल वसुली करत वसुलीचा उच्चांक केला आहे. मार्चअखेरीस अवघी ४४ लाखांच्या थकबाकीदारांच्या यादीत शासकीय कार्यालयांचाच अधिक समावेश आहे. विभागीय कार्यालयांतर्गत खेड, लोटे, दापोली नं. १ व २ व मंडणगड या पाच उपविभागांतर्गत वीज ग्राहकांची संख्या १ लाख ६० हजार ६०९ आहे. यामध्ये थकबाकी व मार्चमधील देयके मिळून १६.८१ कोटीचे उद्दिष्ट विभागीय कार्यालयाला दिले होते. यात मार्चमधील १४.५१ कोटींच्या देयकाचा समावेश होता.
महावितरणचे अधीक्षक अभियंता वैभव पातोडे, मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या मार्गदर्शनानुसार विभागीय कार्यकारी अभियंता प्रमोद बाबरेकर यांच्या नेतृत्वाखाली खेड उपविभागाचे अभियंता दीपक सपकाळ, लोटेचे नीलेश नानोटे, दापोली नं. १ चे अरविंद कुकडे, दापोली नं. २चे प्रदीप काळे, मंडणगडचे राम कावळे यांच्यासह अधिकारी व जनमित्रांच्या पथकांनी वसुलीसाठी मेहनत घेतली. मार्चचे उद्दिष्ट पूर्ण करताना ११५.११ टक्के तर दिलेल्या उद्दिष्टांपैकी ९९.४१ टक्के वसुली झाली; मात्र खेड, दापोली व मंडणगड तालुक्यातील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांकडून वीजबिले थकल्याने मार्चअखेरीस केवळ ४४ लाख रुपयांची थकबाकी राहिली. ९९ टक्के वसुली केल्याबद्दल विभागीय कार्यकारी अभियंता प्रमोद बाबरेकर यांच्या हस्ते अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.