खेड:- तालुक्यातील बहिरवली मार्गावर खारी गावानजीक शाळेत जात असलेल्या दोन विद्यार्थ्यांना वाहनाची धडक बसली. या अपघातात दोन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सनील शिंदे (वय १७, रा. नांदगाव) व अनिकेत देवळे (१९, रा. नांदगाव) हे नांदगांव- खारी येथून शहरातील श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे चालत जात होते. खारी गावातील बसथांब्याजवळ खेड येथून पन्हाळजेकडे पोल्ट्री व्यावसायिकांना पुरवठा करण्यासाठी कोंबड्या घेऊन जाणाऱ्या मालवाहू मोटारीने या दोघांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघानांही शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत येथील पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास पोलिस करत आहेत.