खेडमध्ये ट्रक – दुचाकी अपघातात तरुण ठार

खेड:- सुखदर फाटा, फुरुस चौगन मोहल्ला येथे ट्रकने दुचाकीस्वाराला विरुध्द दिशेला जावून धडक दिल्याने दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वैभव आत्माराम शिगवण (26, भरणे घडशीवाडी, खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 नारायण चंद्रू वाडकर (48, बोरगाव, वाई, सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद शुभम दिवेकर (26, भोस्ते विराचीवाडी, खेड) याने खेड पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम दिवेकर हा आपल्या ताब्यातील यामाहा कंपनीची एफझेड दुचाकीवरुन मित्र वैभव शिगवण याला घेउन वाकवली ते खेड असा चालला होता. याचवेळी खेड बाजूकडून दापोलीकडे जाणार्‍या ट्रक (एमएच04, जीएफ 8520) वरील चालक नारायण वाडकर हा भरधाव वेगाने चालला होता.त्याने विरुध्द दिशेला जाउन शुभम दिवेकर याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीच्या मागील सीटवर बसलेला वैभव शिगवण याच्या डोक्यावर ट्रकचे चाक गेल्याने रक्तस्राव झाला. आणि यातच त्याचा मृत्यू झाला.

या अपघातात वैभव शिगवण याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालक नारायण वाडकर याच्यावर भादविकलम 304 (क), 279, 337, 338, मोटर वाहन कायदा कलम 184, 134 (अ), ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.