खेडमध्ये चोरद नदीत पोहताना तरुणाचा मृत्यू

खेड:- तालुक्यातील भरणे येथील जाधववाडी जवळील चोरद नदीच्या पात्रातील ओझरडोह येथे शुक्रवारी दि. 16 रोजी दुपारी पोहत असताना डोक्याला मार लागून एका 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

देवेंद्र दिलीप राणे (26, रा. तुळशी बुद्रुक, ता. खेड) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो आपल्या मित्रपरिवारासह पोहण्यासाठी नदीत गेला होता. पोहत असताना सूर मारताना त्याच्या डोक्याला काहीतरी कठीण वस्तू लागल्याने तो बेशुद्ध झाला. मित्रांनी त्याला तत्काळ उपजिल्हा रुग्णालय कळंबनी, खेड येथे नेले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेला देवेंद्र एका लग्नसोहळ्यासाठी मुंबईहून गावी आला होता. शिंदे शिवसेनेचे खवटी विभागप्रमुख दिलीप राणे यांचा तो मुलगा. नातेवाईकांसमवेत 6 ते 7 जण जंगलमय भागात फिरण्यासाठी गेले होते. रणरणत्या उन्हामुळे सर्वांना भरणे येथील नदीपात्रात पोहण्याचा मोह आवरला नाही. सर्वजण पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले होते. याचदरम्यान, पाण्याचा अंदाज आला नाही व सूर मारताना त्याच्या डोक्याला मार लागला.

या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड व सहकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेची माहिती मिळताच मतदारसंघाच्या दौर्‍यावर असलेले गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांनी सायंकाळी उशिरा राणे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. या घटनेची नोंद खेड पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.