नांदगाव येथे अज्ञाताचे कृत्य; अंदाजे तीन लाखाची हानी
खेड:- तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगावजवळ असलेल्या ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला सोमवारी मध्यरात्री आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या भीषण आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून संबंधित व्यावसायिकाचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे हॉटेल सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपुरकर यांच्या मालकीचे आहे. सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तात्काळ जलाल राजपुरकर यांना फोनद्वारे माहिती दिली. मात्र, तोपर्यंत आगीने विक्राळ रूप धारण केल्याने हॉटेलमधील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.
घटनेनंतर आगीचे नेमके कारण काय याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. संबंधित मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वनवा लागल्याचे आढळून येत नसून ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा त्यांना संशय आहे. त्यामुळे ही घटना अपघाती नसून घातपाताची असू शकते, अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे.दरम्यान, काही महिन्यांपूर्वी याच हॉटेलच्या आवारात काही व्यक्ती अवैधरित्या प्रवेश करून मद्यप्राशन करत असल्याचे प्रकरण उघड झाले होते. त्या वेळी जलाल राजपुरकर यांनी संबंधितांना पकडले असता त्यांच्याकडून धमकी देण्याचा तसेच मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर सध्याची आग लावण्याची घटना अधिक संशयास्पद ठरत आहे.
याशिवाय, हॉटेलजवळील जुन्या रस्त्यावरील पुलावर काही व्यक्ती नेहमीच मद्यप्राशन व इतर नशेच्या पदार्थांचे सेवन करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रारही समोर येत आहे.या सर्व प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच परिसरातील अशा गैरप्रकारांना आळा घालावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. एकंदिरतच पोलीसांचा तपास सुरु असून अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र हा निव्वळ अपघात होता की कोणी घातपाताचा कट रचला होता याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अशा घटनेमुळे देखील नागरिकांमध्ये भिती व्यक्त केली जात आहे.









