खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील ऐनवली परिसरातील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांमध्ये अल्पवयीन विवाहित बालिका आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
ऐनवली येथील एका वीटभट्टीवर परजिल्ह्यातून आलेले मजूर काम करत आहेत. या कामगारांच्या वस्तीवर दोन विवाहित अल्पवयीन जोडपी असल्याची माहिती समोर आली होती. संशयावरून या मुलींना वैद्यकीय तपासणीसाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर या मुलींचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले. हा गंभीर प्रकार लक्षात येताच डॉक्टरांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले.
पोलिस तपास आणि पुढील कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत या बालिकांचे विवाह झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
संबंधित वीटभट्टी नेमकी कोणाच्या मालकीची आहे आणि तिथे काम करणाऱ्या मजुरांची ओळखपत्रे तपासली होती का, यादृष्टीनेही तपास सुरू आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.









