ट्रक चालकावर 2 महिन्यांनी गुन्हा
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील बोरज स्टॉपजवळ १० मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात घडला. खेड पोलीस ठाण्यात संबंधित ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र कुमार नानकु राम यादव (रा. विरापूर फतानपूर, राणीगंज, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक महेंद्र कुमार नानकु राम यादव हा त्याच्या ताब्यातील ट्रक ( जी.जे.१२ बी.एक्स. ८११३) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून चिपळूणच्या दिशेने जात होता. यावेळी आरोपीने परिस्थितीचे भान न ठेवता ट्रक अचानक रिव्हर्स घेतला. याचवेळी चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मागून येणारी मोटारसायकल ( एम.एच ०८ बी.ए. ५७०८) ला पाठीमागील बाजूला धडकली.
या अपघातात मोटारसायकल चालक शुभम सुधीर पाचागले (२६, रा. बोरज आग्रेवाडी, खेड) यांना दुखापत झाली. यामध्ये दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.