खासगी बसच्या धडकेत धामणसेत दोन बैलांचा मृत्यू

रत्नागिरी:- बेदरकारपणे बस चालवून दोन बैलाना धडक देत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वा.सुमारास धामणसे येथील हॉटेलसमोर घडली.
याबाबत विश्वनाथ अनंत आग्रे (45,रा.धामणसे रेवाळेवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.

त्यानुसार,मंगळवारी सायंकाळी ते आपली गुरे चरवून चाफे ते गणपतीपूळे रस्त्याने घरी घेउन जात होते. गुरे डाव्या बाजूने चालत जात असताना धामणसे येथील हॉटेल समोर आले असता गणपतीपुळेकडून येणाऱ्या भरधाव खाजगी बसने त्यांच्या दोन बैलांना धडक देत अपघात केला. या धडकेमुळे दोन्ही बैल रस्त्यावर तडफडत पडले असताना बस चालक न थांबता निघून गेला. याप्ररणी अज्ञात चालकाविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 325,281, मोटार वाहन कायदा कलम 184,134,/177, प्राण्यांना क्रुरपणे वागविण्यास प्रतिबंधक करण्याबाबत अधिनियम कलम 11(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.