खातेदारांची रक्कम परस्पर लांबवली; डाकपालाविरोधात गुन्हा

खेड:- तालुक्यातील कोतवली येथील ६ खातेदारांना विश्वासात न घेता त्यांच्या बचत खात्यातील १ लाख १२ हजार ५०० रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात न भरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केली. संशयित डाकपाल समीर रामचंद्र काणेकर यांच्याविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ मे २०२० ते १३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत घडली.

कोतवलीतील शाखेच्या डाकघर कार्यालयात समीर काणेकर डाकपाल पदावर कार्यरत आहेत. पदाचा गैरवापर करत १ लाख १२ हजार ५०० रुपये रक्कमेचा बनावट दस्तऐवज, मौल्यवान रोखे/चलन तयार केले तसेच खातेदारांचा विश्वास संपादित करत त्यांनी खात्यात भरणा करण्याकरिता दिलेली रक्कम त्यांच्या नावे जमा न करता खातेदारांच्या नकळत स्वतःच्या फायद्याकरिता आर्थिक लुबाडणूक करून अपहार केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.