खवटी येथे पादचाऱ्याला अज्ञात वाहनाची धडक; पादचारी गंभीर जखमी

खेड:-  मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील खवटी रेल्वे स्टेशननजीक असलेल्या बुरटेवाडी येथे शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका भीषण अपघातात एक पादचारी गंभीर जखमी झाला आहे. रात्री ठीक ९.०० वाजता ही घटना घडली असून, एका अज्ञात वाहनाने या पादचारी व्यक्तीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर ते वाहन घटनास्थळावरून तातडीने पसार झाले.

​अपघातामुळे सदर पादचारी व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. दरम्यान, या घटनेची माहिती भरणे नाका ब्रिज खाली सेवेसाठी तत्पर असलेल्या श्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी संस्था यांच्या मोफत रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांना मिळाली.

​माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी पादचारी व्यक्तीला तातडीने रुग्णवाहिकेतून उचलून उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे प्राथमिक उपचारांसाठी दाखल केले. हंबीर यांच्या समयसूचकतेमुळे आणि तातडीच्या मदतीमुळे गंभीर जखमी व्यक्तीला वेळेत उपचार मिळणे शक्य झाले आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

​कशेडी वाहतूक पोलीस (ट्रॉफिक पोलीस) आणि खेड पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून, अज्ञात वाहनचालकाचा शोध घेत आहेत. अपघातग्रस्त व्यक्तीची ओळख पटवण्याचे कामही सध्या सुरू आहे.