रत्नागिरी:- दक्षिणेकडून वाहणार्या वेगवान वार्यामुळे खोल समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका मच्छीमारांना बसला आहे. हर्णेतील नौका आंजर्ले खाडीत आश्रयाला असून जयगड, कासारवेली, मिरकरवाडा, नाटे, गुहागरमधील बहूसंख्ये मच्छीमारांनी बंदरातच नौका उभ्या करुन ठेवणे पसंत केले आहे. १४ सप्टेंबरपर्यंत ही परिस्थिती राहील अशी शक्यत वर्तविण्यात आली आहे. तर धोका पत्करुन मासेमारीला गेलेल्यांना पर्ससिननेट, ट्रॉलिंगवाल्यांना उष्टी बांगडीसह गेदर (ट्युना) मासा मिळत आहे.
हवामान विभागाने तीन दिवसांचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण किनारपट्टीवर हलके वारे वाहत असून पाण्यालाही करंट आहे. गेले दोन दिवस ठिकठिकाणी पावसानेही हजेरी लावली आहे. वादळामुळे खोल समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत. या परिस्थितीमध्ये खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणे शक्य नसल्याने अनेक मच्छीमारांनी नौका किनार्यावर उभ्या करून ठेवल्या आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर या पावसाच्या दोन महिन्यामध्ये मासेमारी करताना बदलत्या वातावरणाला वारंवार सामोरे जावे लागत आहे. ट्रॉलिंग, गिलनेटसह छोट्या नौकांद्वारे मासेमारी करण्यास १ ऑगस्टपासून आरंभ झाला; परंतु वादळी वातावरणामुळे मच्छीमारांना वारंवार ब्रेक घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. गेले दोन दिवस मासेमारीत आलेल्या अडथळ्यामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तीच परिस्थिती पर्ससिननेट मासेमारीची आहे. १ सप्टेंबरपासून मासेमारीला आरंभ झाला; पण सुरवातीलाच खराब वातावरणामुळे खोल समुद्रात मासेमारी करणे धोक्याचे ठरत आहे. दापोली तालुक्यातील हर्णे बंदरातील सुमारे पाचशेहून अधिक नौका सुरक्षिततेसाठी आंजर्ले खाडीत उभ्या करुन ठेवलेल्या आहेत. मिरकरवाडा बंदरातील पर्ससिननेटसह काही ट्रॉलर्स्वाले रविवारी सकाळी मासेमारीला गेले होते. त्यांना उष्टी बांगडीसह गेदर मासा लागला आहे. उष्टी बांगडी हा फिशमिलला दिला जातो. सध्या पर्ससिननेटला १५०-२०० डिश (३२ किलो एक डिश) उष्टी बांगडी हा मासा मिळत आहे. एका डिशचा दर सर्वसाधारणपणे ५५० रुपये मिळतो. तर गेदर माशाला किलोला दिडशे रुपये दर बाजारात मिळत आहे. सध्या वातावरण बिघडल्यामुळे मच्छीमारीची स्थिती बिकट आहे. मासेमारीसाठी अनुकूल वातावरणाची प्रतीक्षा मच्छीमार करत आहेत.