खत विक्रीसाठी ‘ई-पॉस’ प्रणाली अनिवार्य

अन्यथा परवाना होणार रद्द

रत्नागिरी:- सर्व किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना आता अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. खतांच्या विक्रीची नोंद तात्काळ आणि अचूक पद्धतीने प्रणालीमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई होऊ शकते.

खत विक्रेत्यांकडे असलेले ई-पॉस मधील खत आणि प्रत्यक्ष गोदामातील खताचा साठा यात कोणतीही तफावत असू नये. यासाठी रासायनिक खतांच्या विक्रीची नोंद एफएमएस (आयएफएमएस) प्रणालीमध्ये रिअल टाइम भरणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन केले जात आहे की नाही, हे तपासण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर खत निरीक्षकांना नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या विक्रेत्यांकडे ई-पॉस आणि प्रत्यक्ष साठ्यात फरक आढळेल, त्यांच्या परवान्यावर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना परवाना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ज्या विक्रेत्यांनी अद्याप नवीन एल 1 सिक्युरिटी ई-पॉस मशीनचा वापर सुरू केलेला नाही, त्यांनी १० ऑगस्ट २०२५ पूर्वी कृषी विकास अधिकारी, जि.प. यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून ती मशीन प्राप्त करून अंमलबजावणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.